नितीन काळेल
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यात १८ वर्षांवरील नागरिकांचे कोरोना लसीकरण सुरू असून २० लाखांपैकी ५ लाख ४० हजार नागरिकांना पहिला डोस मिळाला आहे. तर ४५ वर्षांवरील ५० टक्के नागरिकांना लस दिली आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेची दररोज एक लाख नागरिकांना कोरोना डोस देण्याची क्षमता असून १८ वर्षांवरील १५ लाख लोकांना लसीकरण बाकी आहे. लसीचा मुबलक पुरवठा झाल्यास तीन आठवड्यांत मोहीम फत्ते होऊ शकते, अस विश्वास या यंत्रणेला आहे.
जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सना लस देण्यात आली. त्यानंतर ६० वर्षांवरील ज्येष्ठ आणि ४५ ते ५९ वर्षांतील कोमॉर्बिड नागरिकांना कोरोना लसीचा डोस देण्यास सुरुवात झाली. दुसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील सर्वांनाच लस मिळू लागली. त्यासाठी शासकीय आरोग्य केंद्रे आणि खासगी काही रुग्णालयात ही सुविधा सुरू झाली.
आता एक मेपासून कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस देण्याचा निर्णय झाला; पण हा निर्णय सद्य:स्थितीत तरी यशस्वी होताना दिसून येत नाही. कारण, कोरोना लसीचा साठाच मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाही. अगोदरच ४५ वर्षांवरील नागरिकांना लस मिळण्याचे प्रमाण कमी आहे. त्यातच नवीन समस्या निर्माण होत आहे.
जिल्ह्यात ४५ वर्षांवरील कोरोना लस लाभार्थी जवळपास ९ लाख २५ हजार आहेत. तर १८ ते ४४ वयोगटातील जवळपास ११ लाखांहून अधिक आहेत. जिल्ह्याला लस उपलब्ध होईल त्याप्रमाणात लसीकरण सुरू आहे. त्यासाठी जिल्ह्यात ४४० हून अधिक केंद्रांत ही सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. या ठिकाणी रोटेशनप्रमाणे नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. दररोज कमी-जास्त प्रमाणात १६२ केंद्रात लस देण्यात येते; पण तेथेही पुरेसा साठा नसतो. त्यातच कधी-कधी चार-चार दिवस लस येत नाही. त्यामुळे लसीकरणाला खीळ बसत आहे.
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची दररोज एक लाख नागरिकांना कोरोना लस देण्याची क्षमता आहे. त्याप्रमाणे प्रशासनाने नियोजनही केले आहे; पण लस उपलब्ध होईल त्याप्रमाणात काही केंद्रेच सुरू करून नागरिकांना लसीचा डोस देण्यात येतो. सद्य:स्थितीचा विचार करता १८ वर्षांवरील जिल्ह्यातील लोकसंख्या २० लाख ३२ हजार १४६ आहे. त्यापैकी ५ लाख ४० हजार १४५ नागरिकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. टक्केवारीत हे प्रमाण २७.५ टक्के आहे. तर ४५ वर्षांवरील लोकसंख्या ९ लाख २५ हजारांवर आहे. यामधील ५० टक्के लोकांना पहिला डोस मिळाला आहे.
राज्याच्या इतर जिल्ह्याच्या तुलनेत साताऱ्याचे काम प्रगतिपथावर आहे. याला कारण म्हणजे सूक्ष्म नियोजन, आरोग्य यंत्रणेची तत्परता आणि गाव पातळीवरील आरोग्य सेवक, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका आणि विविध समित्या यांचा पुढाकार. यामधूनच हे यश मिळालेले आहे. त्यामुळे जिल्ह्याला मुबलक प्रमाणात यश मिळाल्यास १८ वर्षांवरील राहिलेल्या १४ लाख ९२ हजार लोकांना तीन आठवड्यांच्या आत लसीचा पहिला डोस मिळू शकतो.
पॉइंटर :
- जिल्ह्यातील लोकसंख्या अंदाजे ३० लाख
- ६० वर्षांवरील नागरिक ४०१८८४
- ४५ ते ५९ वर्षांतील लोकसंख्या ५२३९५३
- १८ ते ४४ वयोगटील नागरिक ११०६३०९
....................................
- जिल्ह्याला मिळालेले कोरोना लसीचे डोस ६४८०५०
- लस घेतलेले नागरिक ६२७७९० (४५ वर्षांवरील)
- प्रथम डोस ५४०१४५
- दुसरा डोस ८७६४५
..................
चौकट :
१८ वर्षांवरील लसीकरण ४ हजारांवर
जिल्ह्यात एक मेपासून प्रायोगिक तत्त्वावर १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोरोना लसीकरण सुरू आहे. त्यासाठी ५ केंद्रात प्रायोगिक तत्त्वावर लसीकरण सुरू झालेले आहे. या ठिकाणी गुरुवारपर्यंत ४२८४ जणांना लस देण्यात आली आहे.
...............................
कोट :
जिल्ह्यातील नागरिकांना कोरोना लस देण्याबाबत सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे दिवसात एक लाख लोकांना लसीचा डोस देऊ शकतो एवढी क्षमता आहे. आतापर्यंत एका दिवसात ३७ हजार लोकांना लस देण्यात आल्याचा उच्चांक आहे. जिल्ह्यातील ४५ वर्षांवरील ५० टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. तर १८ वर्षांवरील २७ टक्क्यांवर आहे. लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्यास १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना तीन आठवड्यात लस मिळू शकते.
- विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
फोटो दि.०७सातारा लसीकरण फोटो...
फोटो ओळ : सातारा येथील दिवंगत क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर लसीकरणासाठी अशी रांग लागत आहे. (छाया : जावेद खान)