कराड : आपणाला जाती धर्मात अडकवणारे लोकच समाजातील सर्वात मोठे गुंड आहेत. त्यांच्यापासून सावध रहा. जात- धर्म पाळणार नाही अशी शपथ घ्या. त्याऐवजी एकमेकांना दिलेले शब्द पाळा असे परखड मत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना व्यक्त केले.कराड येथील सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयात शुक्रवारी ४२ व्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे उद्घाटन नाना पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पाटेकर बोलत होते. यावेळी समृद्धी जाधव ,प्राचार्य मोहन राजमाने, प्राचार्य राजेंद्र शेजवळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.तुम्ही चित्रपटातील भूमिकांमधून अन्याय अत्याचारावर प्रहार करता, वास्तव मांडता, बोलता. पण प्रत्यक्ष आम्ही तसा प्रयत्न केला तर लोक अंगावर येतात? असा प्रश्न एका विद्यार्थ्याने केला. त्यावर बोलताना पाटेकर म्हणाले, खरं बोलायचं असेल तर परिणामांची काळजी करू नका. मरणाची भीती जर का मनातून एकदा गेली तेव्हा माणसाला कशाचीही भीती वाटत नाही. हे लक्षात घ्या.तरुण विद्यार्थ्यांना नेमका काय संदेश द्याल? यावर पाटेकर म्हणाले, तुम्हा सर्वांना मतदानाचा हक्क मिळाला की तेव्हा मतदान करताना पक्ष नको तर माणूस पहा. मतदान करताना भ्रष्ट होऊ नका. मग तुम्हाला अपेक्षित असणारे राष्ट्र उभे राहिला मदत होईल.चित्रपट क्षेत्रात एवढे नाव, पैसे कमावल्यानंतर नाम फाउंडेशन काढावेसे का वाटले? यावर बोलताना पाटेकर म्हणाले, मला चित्रपट क्षेत्रातून नाव पैसे मिळाले. पण लोकांची कामे केल्यावर जो आनंद मिळतो त्या आनंदासाठी मी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून कार्यरत आहे.कालच्या अन आजच्या युवा पिढीत काय फरक वाटतो? या प्रश्नाला उत्तर देताना कालच्या पिढीपेक्षा आजची पिढी अधिक सगज आहे. आज साधनांची सुबत्ता आहे. पण आजच्या तरुण पिढीने सोशल मीडियापासून स्वतःला वाचवले पाहिजे. असे पाटेकर त्यांनी सांगितले.आमच्या वडिलांना शेती कमी आहे. अशा अल्पभूधारक शेतकऱ्यांना काय सांगाल? असा प्रश्न एका विद्यार्थ्याने केला. त्यावर आपल्या राबणाऱ्या शेतकरी वडिलांना जास्त शेती घेऊन देणे ही जबाबदारी तुमची आहे. त्यासाठी शिका मोठे व्हा असे पाटेकर यांनी सांगितले.
तुम्हाला मुख्यमंत्री होण्याची संधी, ऑफर कोणी दिली तर? या प्रश्नाला उत्तर देताना पाटेकर म्हणाले, मला राजकारणात जायचं असतं तर यापूर्वीच गेलो असतो. पण तेथे मला माझेपण टिकवता येणार नाही. याची मला जाणीव आहे. त्यामुळे तसा विचार मी कधी केलेलाच नाही.