महाबळेश्वर : स्वच्छ सर्वेक्षण या मोहिमेला व्यापक रूप देण्यासाठी महाबळेश्वर पालिकेने अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. या अंर्तगत स्वच्छता अॅप वर प्राप्त झालेल्या तक्रारीचे पालिकेकडून निरसन केल्यानंतर अभिप्राय नोंदविणाऱ्या संबंधित तक्रारदारास पंचवीस रुपयांचा मोबाईल रिचार्ज दिला जाणार आहे.याबाबत माहिती देताना नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे म्हणाल्या, केंद्र शासनाच्या नगर विकास विभागाने स्वच्छता अॅप विकसित केले आहे. स्वच्छतेविषयी तक्रार नोंदविण्यासाठी नागरिकांना प्रथम हे अॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करावे लागणार आहे. त्यामुळे शहरातील स्वच्छतेविषयक तक्रारी नागरिकांना मोबाईल अॅपद्वारे करता येणार आहे.
या स्वच्छता मोहिमेला व्यापक रूप देण्याबरोबरच स्वच्छता अभियानात महाबळेश्वरला अव्वल करण्यासाठी पालिकेने अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत संबंधित तक्रारदाराला प्रथम अॅपद्वारे स्वच्छतेविषयक तक्रार करावी लागणार आहे. पालिकेकडून या तक्रारीचे तातडीने निरसन केले जाईल.
यानंतर संबंधित तक्रारदाराने पालिकेच्या कार्यतत्परतेबाबत स्वच्छता अॅपद्वारे आपला अभिप्राय नोंदविल्यास त्याला पंचवीस रुपयांचा मोबाईल रिचार्ज दिला जाणार आहे. जानेवारी व फेब्रुवारी २०१८ मध्ये शहरात स्वच्छ सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येणार असून, स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जनजागृतीही केली जाणार आहे.... अन्यथा दंडात्मक कारवाईमहाबळेश्वर शहरातील कचरा घंटागाडीद्वारे गोळा केला जातो. मात्र, अनेक नागरिक अथवा गृहिणी घरातील कचरा घंटागाडीत टाकत नसल्याने पालिकेच्या निदर्शनास आले आहे. ही बाब स्वच्छतेच्या दृष्टीने हितकारक नाही. नागरिकांनी आपल्या घरातील कचरा घंटागाडीतच टाकावा. जे असे करणार नाहीत त्याच्यावर पालिका दंडात्मक कारवाई करेल, असा इशारा मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील यांनी दिला आहे