सातारा : लोकसभा निवडणूक निकालांचे भविष्य वर्तवण्यासाठी भविष्य सांगणार्या ज्योतिषांना दिलेल्या जाहीर आव्हानांची फलश्रुती झालीच नाही. अखेरपर्यंत एकही प्रवेशिका आली नाही. नेहमीप्रमाणो ज्योतिषवाले स्पर्धेत भाग घेत नाहीत याचीही प्रचिती आली. अब्जावधी किलो मीटरवरील रास आणि नक्षत्रांचा हवाला देणार्या ज्योतिषांना काही हजार किलो मीटरवरील एखाद्या मतदारसंघाविषयी विचारणा केली तर त्यांनी थयथयाट कशाला करायचा ? आपलं नाणं खणखणीत असेल तर भिती कशाला ? अशी विचारणा महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केली. येथील पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. यावेळी कुमार मंडपे, प्रशांत पोतदार, उदय चव्हाण, डॉ. शैला दाभोलकर आदी उपस्थित होते. पाटील म्हणाले, महाराष्ट्र अंनिस ज्योतिषाचा फोलपणा सातत्याने मांडत आलेली आहे. फलज्योतिष शास्त्र आहे असा दावा करणार्या मंडळींना समितीतर्फे नेहमीच आव्हान दिले आहे. काहीवेळा आव्हान स्विकारायचा दावा करुन वाद-संवाद झाला. परंतु, प्रत्यक्षात आव्हान प्रक्रिया सिध्द झालीच नाही. त्यामुळे दि. २८ फेब्रुवारी २०१४ या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त अंनिसतर्फे देशातील ज्योतिषांना लोकसभा निवडणूकच्या निकालाचे भविष्य वर्तवावे असे आवाहन करण्यात आले होते. त्यासाठी अचूक भविष्य वर्तवणार्यांना २१ लाख रुपयांचे बक्षीस जिंकण्याची संधी देण्यात आली होती. या आव्हान प्रक्रियेसाठी दि. ३० एप्रिलपर्यंत एकही प्रवेशिका आली नाही. नेहमीप्रमाणे ज्योतिषवाले स्पर्धेत भाग घेत नाहीत, याचीही यानिमित्ताने प्रचिती आली. काही तथाकथित ज्योतिषांनी तर फारच उतावळेपणा केलेला होता. प्रवेशिका न पाहताच मोदींचे सरकार येणार, काँग्रेसचे सरकार येणार असल्याचे सांगून टाकले. मला बक्षीस मिळाले तर निम्मे अनाथ आश्रमाला आणि निम्मे स्वयंसेवी संस्थांना द्या. एकजण म्हणाले की, मी तीनच प्रश्नांची उत्तरे देतो. तर दुसरे म्हणाले, उमेदवाराला मला फक्त फोन करायला सांगा. त्यांच्या आवाजावरून भविष्य सांगतो. असे काय भविष्यवेत्ते असतात काय ? आपलं मन, मेंदू आणि मनगट यांच्या जोरावर आपले भविष्य घडवण्याची गरज आहे, असेही पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
नाणं खणखणीत असेल तर भीती कशासाठी ? अंनिस : निकालात ज्योतिषवाले भाग घेत नाहीत याची प्रचिती
By admin | Published: May 15, 2014 12:19 AM