कऱ्हाड (जि. सातारा) : ‘राज्यातील सरकार अडीच वर्षे नक्की कोण चालवत होते, हे सर्वांना माहीत आहे. शिवसेनेचे सरकार असतानाही शिवसैनिकांवरच अन्याय होत होता. म्हणून या ५० बहाद्दरांनी मला हा निर्णय घ्यायला लावला. गेल्या चार महिन्यांत आम्ही लोकहिताचे निर्णय घेत आहोत. त्यामुळे विरोधकांचा जळफळाट होत आहे. काहीही टीका सुरू आहे; पण त्यांनी टीका करण्यापेक्षा हिंमत असेल तर हे सरकार पाडून दाखवावे,’ असे आव्हान मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.
कऱ्हाड येथे शुक्रवारी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्यासह त्यांच्या आघाडीच्या पदाधिकारी व माजी नगरसेवकांनी बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार महेश शिंदे उपस्थित होते.
एकनाथ शिंदे म्हणाले, ‘गद्दारी केली, असा आरोप आमच्यावर करतात; पण खरे तर टीका करणाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी केली आहे. आम्ही त्याला कामाने उत्तर देत आहोत. हा मिंदे गट नव्हे, तर हा बाळासाहेबांच्या विचारांचा सच्चा शिंदे गट आहे. बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, एक दिवस पंतप्रधान करा. मी काश्मीरमधील ३७० कलम हटवून दाखवतो. ते तेच काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. राज्यात मुख्यमंत्री शिवसेनेचा असताना शिवसैनिकांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. हाच विश्वास मी सगळ्यांना देतोय. तो लोकांना पटतोय. म्हणून तर दररोज पक्षप्रवेश होत आहेत.’
आम्ही वन-डे खेळणारे -आम्ही कसोटी खेळणारे नाही तर वन-डे, २०/२० खेळणारे खेळाडू आहोत. कमी बाॅलमध्ये जादा रन कशा काढायच्या, हे आम्हाला चांगले माहीत आहे. त्यामुळे अडीच वर्षांमध्ये राज्यातील सरकार पथदर्शी काम करून दाखवेल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यात कृषी उद्योग उभारणार! -‘रावणाला दहा तोंडे होती. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नाला शंभर तोंडे आहेत म्हणूनच कमी खर्चात आणि कमी श्रमात जास्त उत्पन्न कसे मिळेल, याकडे कृषी विभागाने लक्ष दिले पाहिजे. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यासाठी सातारा जिल्ह्यात पाचशे एकर क्षेत्रात कृषी इंडस्ट्रीज साकारणार आहोत’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.