धनाजी गुरव;सातारा : देवस्थान इनाम मुक्ती संघर्ष समितीतर्फे सातारा येथील नगर वाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये गुरव पुजारी सेवेकरी समाजाचा पश्चिम महाराष्ट्र विभागीय मेळावा झाला. गुरव समाज संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार गुरव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यात महत्त्वपूर्ण ठराव करण्यात आल्याची माहिती धनाजी गुरव यांनी दिली. देवस्थान जमीन नसेल तर मंदिर सेवा बंद करण्याचे आवाहन या मेळाव्यात करण्यात आले.
मेळाव्याच्या पहिल्या सत्रात प्रामुख्याने देवस्थान जमीन व मंदिराचे व्यवस्थापन या प्रश्नावर वक्त्यांनी मनोगत व्यक्त केले. महसूल मंत्र्यांचा चुकीचा निर्णय व धर्मादाय आयुक्तांनी जाहीर केलेल्या धोरणांचा तीव्र शब्दांत निषेध यावेळी व्यक्त केला.
मेळाव्याच्या दुसऱ्या सत्रात नेताजी गुरव लिखित ‘देवस्थान जमीन गुंता कसा सोडवाल?’ या पुस्तकाचे प्रकाशन भरत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पुस्तक वाचल्यावर देवस्थान जमिनीतील अनेक तिढे समजतात. सरळ व सोप्या भाषेत प्रत्यक्ष घडलेल्या अनेक घटना लिहून वाचकांना नुसते वाचनीय नव्हे तर मार्गदर्शक असे पुस्तक आहे. या जटील प्रश्नाचा उगम आणि त्यातून मार्गही दाखविला आहे, असे चंद्रकांत खंडाईत यांनी सांगितले. ओबीसी संघटनेचे भरत लोकरे यांनी व्यापक संघर्षाची मागणी केली. मेळाव्यात अॅड. सुमती पाटील, सुनील गुरव, शिवाजी गुरव, अरविंद पांबरे, नागेश गुरव, डी. जी. गुरव, कैलास शेलार यांनी मनोगत व्यक्त केले. सुरक्षा साखरे यांनी सूत्रसंचालन केले. तर अरविंद गुरव यांनी आभार मानले.