कऱ्हाड : राज्यातील सरकार अडीच वर्ष नक्की कोण चालवत होते हे सर्वांना माहीत आहे. शिवसेनेचे सरकार असतानाही शिवसैनिकांवरच अन्याय होत होता. म्हणून तर या ५० बहाद्दरांनी मला हा निर्णय घ्यायला लावला. गेल्या ४ महिन्यात आम्ही लोकहिताचे निर्णय घेत आहोत. त्यामुळे विरोधकांचा जळफळाट होत आहे. काहीही टीका सुरू आहे. पण त्यांनी टीका करण्यापेक्षा हिम्मत असेल तर हे सरकार पाडून दाखवावे असे जाहीर आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिले.कऱ्हाड येथे शुक्रवारी आयोजित जाहिर मेळाव्यात यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्यासह त्यांच्या आघाडीच्या पदाधिकारी व माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते. पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार महेश शिंदे यांच्यासह बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही गद्दारी केली असा आरोप आमच्यावर करतात; पण खरंतर टीका करणाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची गद्दारी केली आहे. आम्ही तर त्याला कामाने उत्तर देत आहोत. हा मिंदे गट नव्हे तर हा बाळासाहेबांच्या विचारांचा सच्चा शिंदे गट आहे. आम्ही जे करायचं ते उघड करतो. लपून-छपून काहीच करीत नाही. मी फक्त काम करत राहणार व महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणार आहे.बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, मला एक दिवस पंतप्रधान करा मी काश्मीरमधील ३७० कलम हटवून दाखवतो. ते तेच काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करून दाखवले आहे. तर राम मंदिर चे बांधकाम ही पूर्ण होत आहे. म्हणून बाळासाहेबांचे तेच विचार पुढे घेऊन आम्ही निघालो आहोत. अशावेळी टीकाकारांनी गजानन कीर्तिकर, रामदास कदम यासारखे नेते माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून माझ्याबरोबर का येतात याचे आत्मचिंतन केले तर बरे होईल असा सल्लाही त्यांनी दिला.कितीही संकटे आली तरी आम्ही हिंदुत्वाशी गद्दारी करणार नाही. राज्यात मुख्यमंत्री शिवसेनेचा असताना शिवसैनिकांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. हाच विश्वास मी सगळ्यांना देतोय तो लोकांना पटतोय म्हणून तर दररोज पक्षप्रवेश होत आहेत.राज्यात आम्ही भाजप- शिवसेना म्हणून निवडणुकीला सामोरे गेलो होतो .पण निवडणुकीचा निकाल लागला की लगेच आमच्या नेत्यांनी आम्हाला सगळे मार्ग रिकामे आहेत असे सांगून टाकले. बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली देत विरोधकांशी आघाडी केली. पण आम्ही घेतलेल्या निर्णयाने तुमची खोकी बंद झाली म्हणून तुम्ही आमच्यावर टीका करीत आहात; हे जनता आता जाणून आहे.
जाणत्या राजांना सगळं पळवलं ..साताऱ्याला आज पर्यंत जाणत्या राजाने काहीच दिलं नाही. उलट सातारचं पाणी, धरण सगळं पळवलं. त्यांनी नेहमीच आपल्या सर्वांना फसवलं अशी टीका आमदार महेश शिंदे यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली.
सातारचा नेतृत्व मोठ कराएकनाथ शिंदे हे सर्वसामान्य माणसातलं नेतृत्व आहे. ते सातारचे सुपुत्र आहेत. त्यांच्या पाठीशी इथल्या जनतेने ठाम उभे राहून सातारचे नेतृत्व मोठं केलं पाहिजे असं आवाहन आमदार शहाजी पाटील यांनी यावेळी केले.
विश्वासाला तडा जाऊ देणार नाहीकराडचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांनी आपल्या समर्थकांसह शिंदे गटात प्रवेश केला. त्यांना उद्देशून एकनाथ शिंदे म्हणाले, तुम्ही ज्या विश्वासाने माझ्याबरोबर येण्याचा निर्णय घेतला आहे त्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही. कराडच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही. मी घेणारा नाही तर देणारा माणूस आहे.
आम्ही वन्डे खेळणारे खेळाडूआम्ही टेस्ट मॅच खेळणारे नाही तर वनडे;२०/२० मॅच खेळणारे खेळाडू आहोत. कमी बाँलमध्ये जादा रन कशा काढायचा हे आम्हाला चांगले माहित आहे. त्यामुळे अडीच वर्षांमध्ये राज्यातील सरकार पथदर्शी काम करून दाखवेल असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.