पांडुरंग भिलारे-वाई -तीर्थस्थळ, पर्यटनस्थळ, चित्रीकरणस्थळ अशा बहुविध पैलूंनी नटलेले वाई शहर राज्यभरात नावारूपाला येत आहे. मात्र, रस्ते तेवढेच राहिल्याने शहर परिसरात वाहतूक कोंडीची समस्या तीव्र बनली असून, त्यावर तातडीने उपाय योजण्याची गरज बनली आहे. पवित्र कृष्णाकाठ आणि महागणपती मंदिरामुळे तीर्थक्षेत्र अशी वाई शहराची ओळख आहे. महाबळेश्वर, पाचगणी, धोम जलाशय, मेणवली या पर्यटनस्थळी जाणारे रस्ते वाईमधूनच जातात. मांढरदेव हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थानही जवळच असून, या भाविकांनाही वाईमार्गेच जावे लागते. तथापि, शहरातील रस्ते अरुंद असून, पूर्वीचीच रचना कायम राहिल्यामुळे, तसेच शहरातील दुचाकी, चारचाकी वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्याने आता हे रस्ते अपुरे पडू लागले आहेत. ठिकठिकाणी वाहतूक खोळंबल्याचे दृश्य वारंवार दिसू लागले आहे.तालुक्यातून तसेच पाचगणी, महाबळेश्वर येथून नागरिक खरेदीसाठी वाई शहरातच येतात. मात्र वाहतुकीचे कोणतेही नियोजन होत नाही. अरुंद रस्ते, बेशिस्त पार्किंग यामुळे वाहतुकीची सातत्याने कोंडी होते. सामान्यत: आठवडा बाजाराच्या दिवशी, सुट्यांच्या हंगामात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. महाबळेश्वर, पाचगणीला सुट्या घालविण्यासाठी पर्यटक प्रचंड संख्येने येऊ लागले आहेत. पाचगणीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बाजार समिती ते बसस्थानक रस्ता हे कोंडीचे प्रमुख ठिकाण आहे. सोमवारी आठवडा बाजार भरतो. त्या दिवशी गंगापुरी शाहीर चौक ते किसन वीर चौक या रस्त्यावरील प्रत्येक चौकात कोंडी होते. ग्रामीण रुग्णालय परिसर, पोस्ट आॅफीस परिसर या भागात तर वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिक, पर्यटक, भाविकांचा वेळ वाया जातो आणि त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. प्रशासनाने वाढत्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. वाहतुकीची कोंडी हा नित्याचाच विषय झाला आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना व शाळा-कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने ठोस उपाययोजना करून ही समस्या सोडवावी.- सतीश जेबले, संस्थाचालक, वाईशनिवार-रविवार व सुट्ट्यांच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होते. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. त्यामुळे प्रवाशांना, स्थानिक नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. यावर तातडीने उपाययोजना करून नागरिकांना व पर्यटकांना दिलासा द्यावा.- सुहास पाटणे, व्यावसायिक, वाई
घाई असेल तर वाई विसरा!
By admin | Published: October 29, 2014 12:19 AM