तारळे : तारळीच्या प्रश्नांकडे कृष्णा खोरेचे दुर्लक्ष होत आहे. याउलट कृष्णा खोरेचे अधिकारी बंदिस्त कालव्याच्या कामाला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्त सर्वसामान्य शेतकरी वाऱ्यावरच असल्याचे समोर येत आहे. आधी पूनर्वसन, मग धरण ही संकल्पना मागे पडून तारळी प्रकल्पग्रस्तांना प्रशासनाने वाऱ्यावर सोडून दिले आहे. धरणासह इतर योजनांचा पैसा आहे तोपर्यंत दर्जाकडे दुर्लक्ष करून कामे उरकून घेतली. इतर जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे मात्र दुर्लक्ष केले. धरणाची गळती व उपसा सिंचन योजनांचे पोटपाट दोन वर्षांपासून आश्वासनांच्या हवेत तरंगत आहे. प्रकल्पग्रस्तांची फरफट थांबणार की नाही हा प्रश्न प्रकल्पग्रस्त व शेतकऱ्यांना पडला आहे.तारळी धरणातील बाधीत प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नासह इतर योजना पूर्ण होवून धुळखात पडल्या आहेत. त्यासाठी निधीचे कारण पुढे करण्यात येत आहे. पण सुमारे दोनशे कोटी रूपये खर्चाच्या बंदिस्त कालव्याला मात्र रात्रीचा दिवस करण्यात येत आहे. त्यातून निधी लवकरात लवकर संपविण्याचा अधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे. जितके बोगद्याच्या कामाला तितकेच इतर प्रश्नांना सुध्दा अधिकाऱ्यांनी प्राधान्य देण्याची मागणी करण्यात येत आहे. तारळी धरणापासून सुरू होणाऱ्या बोगद्याच्या कामाला तोंडोशी येथील गावकऱ्यांनी तीव्र विरोध केला असून प्रथम त्यांचे प्रश्न सोडविण्याची मागणी केली आहे. त्यानंतर धुमाकवाडी येथून बोगद्याच्या कामाला सुरूवात झाली. अनेकांचा विरोध असूनही तेथील शेतकऱ्यांना वेगवेगळी आमिषे दाखवून विरोध मोडित काढीत बोगद्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. त्याचवेळी तारळे विभागातील सर्व शेती ओलीताखाली आणून उर्वरीत पाणी दूष्काळी भागाला द्या म्हणत शेतकऱ्यांनी आंदोलने केली; पण आंदोलकांनाही तारळीचे पाणी दाखवून त्यांचे बंड जवळपास मोडितच काढले गेले. तारळी धरणाच्या संबंधित अनेक प्रश्न गेल्या पंधरा सोळा वर्षांपासून रखडलेले असताना चालू बोगद्याच्या कामाला मात्र कमालीची मेहनत घेतली जात असल्याचे दिसत आहे. त्यामुळे कृष्णा खोरे विभाग नक्की कशाला प्राधान्य देते हे पून्हा एकदा समोर आले आहे. जुने प्रश्न लोंबकळत ठेवून नवीन निधीच्या कामाला झुकते माप मिळत आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्त, पुनर्वसनासाठी जमिनी दिलेले शेतकरी यांचेमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर) भुसुरूंगामुळे घरांना तडेगतवर्षी बोगद्याचे काम कडव परिसरात आले होते. त्यावेळी मोठे भुसूरूंग उडवून बोगद्याचे काम उरकण्याचा सपाटा लावला होता. कडवे बुद्रुक व भूडकेवाडी येथील अनेक जुन्या नवीन घरांना तडे गेले होते. भुसूरूंगाचे धक्के एवढे मोठे होते की घरातील भांडी दणादण जमिनीवर आदळत होती. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर वैतागलेल्या ग्रामस्थांनी बोगद्याचे काम बंद पाडले. त्यानंतर तज्ञांना पाचारण करून भुसुरूंग उडवून चाचणी घेतली; पण त्यावेळी त्याची तिव्रता मात्र कमी ठेवण्यात आली व घरांना तडे भुसूरूंगाने जात नसल्याने व तुमचे कामच व्यवस्तीत नसल्याचा दिखावा अधिकाऱ्यांनी केला. पंचवीस किलोमिटरचा बोगदाकेंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त वेग वर्धीत सिंचन योजना (एआयबीपी) यातून सुमारे तीनशे कोटी रूपयांचा निधी मंजूर आहे. सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरात बोगदा व पाईपलाईन होणार आहे. यामध्ये धरणापासून धुमाकवाडीपर्यंत बंदिस्त पाईपलाईन सुमारे दोन किलोमीटर, धुमाकवाडी ते हरपळवाडी पर्यंत बंदिस्त बोगद्याने सुमारे बारा किलोमीटर, हरपळवाडी पासून आरफळ कालव्यापर्यंत उर्वरीत अंतरात बंदिस्त पाईपलाईनद्वारे जोडण्यात येणार आहे.
तारळीच्या प्रश्नांकडे ‘कृष्णा खोरे’चे दुर्लक्ष
By admin | Published: June 03, 2015 10:57 PM