पाटण : तालुक्यातील मोरणा परिसरात सुमारे ४० ते ४५ गावे असून, सर्वांना केंद्रबिंदू म्हणून पेठशिवापूर-मोरगिरी बाजारपेठ सोयीस्कर ठरते. मात्र, याच बाजारपेठेच्या परिसरात शासनमान्य दारू दुकानासह अनेक अवैध धंद्यांचे बस्तान आहे. त्यामुळे आत्तापर्यंत अनेकांना दारूच्या आहारी जाऊन जीव गमवावा लागला आहे. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत; तर सध्या तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाऊन व्यसनाधिन होण्याच्या मार्गावर आहे.
मोरणा विभागात मोरणा-गुरेघर मध्यम प्रकल्प असल्यामुळे धरणाच्या खाली असलेली गावे पाण्याचा वापर करून सुजलाम सुफलाम होत आहेत. या धरणाच्या कालव्यांची कामे पूर्ण झाली तर हा परिसर एक सधन भाग म्हणून ओळखला जाईल. तसेच मोरणा भागात पवनचक्क्यांचे जाळे निर्माण झाले असून पर्यटनालाही वाव आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. मोरगिरी आणि पेठशिवापूर या दोन्ही गावांच्या परिसरात बाजारपेठसुद्धा विकसित होत आहे. या भागातील आटोली, कोकिसरे, धावडे, पाचगणी, आंब्रग, किल्ले मोरगिरी, झाकडे, गुंजाळी, माणगाव, नेरळे, आडदेव, कोदळ पुनर्वसित, कुसरुंड, सुळेवाडी, नाटोशी, वाडीकोतावडे, बाहे, दीक्षी, गोकुळ तर्फ पाटण, आंबेघर तर्फ मरळी, काहीर, पाळशी, पाणेरी, आदी गावांतील ग्रामस्थांना पेठ शिवापूर बाजारपेठेत नेहमीच खरेदीला यावे लागते. तसेच या ठिकाणी मुलांना शिक्षणासाठी माध्यमिक विद्यालयही आहे. अशा चांगल्या बाबी असतानाही दुसरीकडे दारू दुकानेही आहेत; त्यामुळे मोरणा परिसरातील अनेकजण व्यसनाच्या विळख्यात अडकत आहेत, ही चिंतेची बाब आहे.
पंचविशीतील मुले दिवसभर या ठिकाणी जाऊन व्यसनाच्या नादी लागल्याचे चित्र दिसत आहे. तसेच पुरुष दिवसभर मोलमजुरी करून संध्याकाळी श्रमपरिहार करण्यासाठी त्यांची पावले पेठ शिवापूरच्या दिशेने वळू लागल्याचे दिसत आहे. जवळच देशी-विदेशी दारू उपलब्ध होत असल्यामुळे ग्रामस्थांना त्याची दररोज चटक लागली आहे.
- चौकट
कुटुंबप्रमुख गमावल्याने मुलाबाळांना करावी लागते चाकरी
मोरणा विभागात गेल्या काही महिन्यांपूर्वी एका कुटुंबप्रमुखाचा दारूच्या आहारी गेल्यामुळे आजारी पडून मृत्यू झाला. त्याच्या पश्चात त्याची पत्नी आणि मुले निराधार झाली आहेत. सध्या आईसह मुले दिवसभर चाकरी करून संध्याकाळी भाकरी कशी मिळेल, यासाठी धडपडताना दिसतात.
- चौकट
मुंबई, पुणेकरही देशीच्या आहारी
मोरणा विभागातील युवक पुणे, मुंबईसारख्या ठिकाणी नोकरी तसेच व्यवसाय करण्यासाठी गेले आहेत. त्यांपैकी काही युवक गावी आल्यानंतर देशी दारू पिण्यासाठी पेठ शिवापूरची वाट धरताना दिसतात. ही परिस्थिती निश्चितच चिंताजनक आहे.
फोटो : १३केआरडी०५
कॅप्शन : मोरणा विभागातील पेठ शिवापूर येथे असलेल्या याच बोळातून गेलेला रस्ता मद्यप्यांना दारू धंद्यांपर्यंत पोहोचवितो. दिवसभर या रस्त्याला मद्यप्यांची वर्दळ असते.