वडूज : अवैध विदेशी दारू विक्रीसाठी वाहतूक करताना गाडी (एमएच ११ बीव्ही ४६०३) वडूज पोलिसांनी ताब्यात घेऊन चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडून समजलेली माहिती अशी की, वडूज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांना गोपनीय बातमीदारामार्फत दहिवडीकडून वडूजकडे एका चारचाकी गाडीतून बेकायदेशीर दारू वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. त्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दीपक देवकर, शांतीलाल ओंबासे, संदीप शेडगे, आण्णा मारेकर, भूषण माने व संतोष काळे हे वडूज येथील काळे मळा परिसरात थांबले. त्याच दरम्यान वाहन (एमएच ११ बीव्ही ४६०३) हे वाहन दहिवडी बाजूकडून आलेले दिसताच ते थांबवून वाहनाची तपासणी केली. त्यामध्ये ४० हजार ३२० रुपये किमतीचे सात विदेशी दारूचे बाॅक्स आणि ३ लाख रुपये किमतीची चारचाकी गाडी वडूज पोलिसांनी जप्त केली. अवैध विदेशी दारूची वाहतूक करणारा चालक रवींद्र शिवाजी संपकाळ (रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव) याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
बेकायदा बिगरपरवाना विदेशी दारू वाहतूक करत असल्याने मुद्देमाल जप्त करून चालक रवींद्र संपकाळ याच्यावर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, गुन्ह्याचा अधिक तपास हवालदार राहुल सरतापे करत आहेत.
२३ वडूज क्राईम
फोटो : अवैध विदेशी दारूसाठ्यासह आरोपीला ताब्यात घेतले. यावेळी मालोजीराव देशमुख व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. (छाया : शेखर जाधव )