सातारा : जिल्हा पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने सातारा तालुक्यात बेकायदा जिलेटिन कांड्या, डिटोनेटर आदी घातक स्फोटकांचा साठा जप्त केला. याची किंमत सहा लाख रुपयांहून अधिक आहे. याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता कालावधीत बेकायदा स्फोटक पदार्थप्रकरणी कारवाईची सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना केली होती. त्यानुसार देवकर यांनी सहायक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार केले. दि. १ मे रोजी निरीक्षक देवकर यांना सातारा तालुक्यातील बोरगाव पोलिस ठाणे हद्दीत एका वाहनातून बेकायदा जिलेटिन स्फोटकांची वाहतूक करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती.त्यानुसार देवकर यांनी पाटील यांच्या पथकाला कारवाईची सूचना केली. बोरगावपासून जवळच पथकाने सापळा रचला. त्यावेळी एका चारचाकी वाहनाला थांबवून तपासणी केल्यावर त्यामध्ये जिलेटिनच्या १०७० कांड्या, डिले डेटोनेटर ५९ नग आणि इलेक्ट्राॅनिक डेटोनेटर १७ असे स्फोटकांचे साहित्य आढळून आले. याप्रकरणी श्रीधर संभाजी निंबाळकर (वय ३१, रा. बोरगाव, ता. सातारा, मूळ रा. वाहगाव, ता. वाई) याला ताब्यात घेऊन विचारणा करण्यात आल्यावर त्याने परवाना नसल्याचे तसेच स्फोटके विक्रीस घेऊन जात असल्याचीही माहिती दिली. त्यामुळे पोलिसांनी स्फोटक साहित्य आणि वाहन असा ६ लाख १७ हजार ९५० रुपयांचा माल हस्तगत केला.कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील, सहायक पोलिस उपनिरीक्षक सुधीर बनकर आणि सहकाऱ्यांसह बाँम्ब शोधक व नाशक पथकाचे उपनिरीक्षक शशिकांत घाडगे, हवालदार महेश पवार, नीलेश दयाळ आदींनी सहभाग घेतला.
साताऱ्यात बेकायदा जिलेटिन कांड्या, डिटोनेटरचा साठा हस्तगत, एकजण ताब्यात
By नितीन काळेल | Published: May 03, 2024 7:43 PM