सातारा : कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथे शासनमान्य रास्त भाव दुकानातील बेकायदेशीर देशी-विदेशी दारू विक्री प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली. या कारवाईत चारचाकी वाहन व दारूसह सात लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना गोपनीय माहितीद्वारे चिमणगाव येथील एका शासनमान्य रास्त भाव दुकानात बेकायदा दारू विक्री होत असल्याचे समजले होते. त्यानंतर त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून कारवाईची सूचना केली.
चिमणगाव येथे पथकाने छापा टाकल्यावर दुकान व दुकान मालकाच्या जीपमध्ये देशी-विदेशी दारूच्या बाटल्या आढळल्या. या पथकाने जीप आणि दारूसह ७ लाख ८ हजार ५७६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, सहायक फौजदार जोतिराम बर्गे, हवालदार अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, नीलेश काटकर, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, संकेत निकम यांनी कारवाईत सहभाग घेतला.
.............................................................