कोरेगाव : ‘कोरोना संकटातून सावरण्यासाठी कोरेगाव मतदारसंघातील रुग्णांसाठी कोरेगाव, पुसेगाव, वडूथ, क्षेत्र माहुली येथे शासनाच्या माध्यमातून कोरोना हॉस्पिटल सुरू केले आहेत. या प्रमुख ठिकाणी सुमारे तीनशे बेड उपलब्ध करून दिले असून, त्यात सुमारे दीडशे ऑक्सिजन बेडचा समावेश आहे,’ अशी माहिती आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली. दरम्यान कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी आवश्यक असलेली विविध औषधे आरोग्य यंत्रणेकडे देण्यात आली आहेत.
कोरेगावातील चॅलेंज ॲकॅडमीमधील शंभर बेडच्या कोरोना हॉस्पिटलमधील रुग्णांच्या जेवणासाठी सुमारे नऊ टन धान्यासह स्वयंपाकाच्या साहित्याचा मोफत पुरवठा करण्यात आला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयात कोविड हॉस्पिटल सुरू करण्यास मान्यता मिळवली आणि तेथे ३० बेडची व्यवस्था करण्यात आली. यावर्षीच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाने व्यापक स्वरूप घेतल्याचे दिसताच उपजिल्हा रुग्णालयात वाढीव बेडची मंजुरी मिळवली आहे. चॅलेंज ॲकॅडमीमध्ये गेल्यावर्षी ४५ बेड उपलब्ध करून दिले होते. आता या ठिकाणची बेडची संख्या वाढवून शंभर केली असून, ३० ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशिन उपलब्ध करून दिल्याने तेवढ्या बेडसाठी ऑक्सिजन उपलब्ध होत आहे.
पुसेगाव आरोग्य केंद्रामध्ये ऑक्सिजनची सेंट्रल लाईन नव्हती, ती मंजूर करून घेतल्याने या ठिकाणी ३० ऑक्सिजन बेडची व्यवस्था झाली असून, स्वखर्चातून जनरेटरही उपलब्ध करून दिला आहे. क्षेत्र माहुली येथेही ३० ऑक्सिजन बेडची व्यवस्था केली आहे. वडूथ आरोग्य केंद्रामध्ये ३० ऑक्सिजन बेडसाठी आमदार निधीतून तरतूद केली असून, ते देखील सुरू झाले आहे. अंगापूर येथेही ३० ऑक्सिजन बेड उपलब्ध करून दिले जाणार आहेत. ल्हासुर्णे आरोग्य उपकेंद्रामध्ये विलगीकरण कक्ष सुरू केला जाणार असल्याचे आमदार शिंदे यांनी सांगितले.
(चौकट..)
ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा...
कोरेगाव ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळवून दिला असून, तेथे नवीन इमारत बांधली आहे. पुसेगाव, वडूथ, ल्हासुर्णे, क्षेत्र माहुली, अंगापूर वंदन येथील आरोग्य केंद्रांच्या इमारतीची कामेही त्याचवेळी मार्गी लावली असल्याने कोरेगाव मतदारसंघात कोविड हॉस्पिटल सुरू करता येऊ शकलो, असेही आमदार शिंदे यांनी सांगितले.