सातारा : मेढा - महाबळेश्वर या मार्गावरील केळघर येथील स्मशानभूमीजवळील ओढ्यावरील पुलाचा भराव वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद पडली. दरम्यान, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याच मार्गावर नवीन बांधण्यात येत असलेल्या पुलावर तातडीने भराव टाकून वाहतूक पूर्ववत सुरू करा, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.
मेढा ते महाबळेश्वर या मुख्य मार्गावर केळघर गावच्या हद्दीत स्मशानभूमीजवळ ओढ्यावरील पुलाचा भराव मुसळधार पावसामुळे आणि ओढ्याला पूर आल्याने गुरुवारी सकाळी वाहून गेला. यामुळे महाबळेश्वर ते मेढा या मार्गावरील वाहतूक बंद पडली आणि सुमारे १२ ते १५ गावांचा संपर्क तुटला. याची माहिती मिळाल्यानंतर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुसळधार पाऊस सुरू असतानाही घटनास्थळी धाव घेतली. वाहून गेलेल्या पुलाची पाहणी केली. सध्या सातारा, मेढा ते महाबळेश्वर या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू असून भराव वाहून गेलेल्या पुलाच्या लगतच नवीन पुलाचे बांधकाम पूर्णत्वास जाण्याच्या मार्गावर आहे. या नवीन पुलावर खडी टाकून तातडीने भराव तयार करावा आणि या मार्गावरील बंद पडलेली वाहतूक त्वरित पूर्ववत सुरू करावी, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.
आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या सूचनेनुसार नवीन पुलावर भराव टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून या मार्गावरील वाहतूक शुक्रवारी सकाळपर्यंत पूर्ववत सुरू होईल, अशी आशा आहे.
या पाहणीप्रसंगी याप्रसंगी जावळी पंचायत समितीचे उपसभापती सौरभ शिंदे, ज्ञानदेव रांजणे, तहसीलदार राजेंद्र पोळ, गट विकास अधिकारी सतीश बुद्धे यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो ओळ : केळघर, ता. जावली येथे वाहून गेलेल्या भरावाची पाहणी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली.
फोटो नेम : २२केळघर