सातारा : ‘उदे गं अंबे उदे’चा जयघोष, ढोल-ताशांचा गजर, फुलांचा वर्षाव अन् रिमझिम बरसणाºया जलाधारांच्या साक्षीने मंगळवारी साताºयात दुर्गामूर्तींचे विसर्जन करण्यात आले. दुपारी साडेबारा वाजता सुरू झालेला विसर्जन मिरवणूक सोहळा तब्बल सोळा तास रंगला. सम्राट मंडळाच्या दुर्गामूर्तीचे सर्वात शेवटी पहाटे साडेचार वाजता विसर्जन झाले. एकूण नव्वद दुर्गामूर्तींना भाविकांकडून भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला.
सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दुर्गामूर्तींची उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली. प्रतिष्ठापनेपासून सलग आठ दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. मंगळवारी विजयादशमीला दुर्गामूर्तींना भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. मूर्ती विसर्जनासाठी सातारा पालिकेच्यावतीने बुधवार नाका व कल्याणी शाळेजवळ कृत्रिम तळ्याची उभारणी करण्यात आली होती.
दुपारी बारा वाजता मिरवणूक सोहळ्यास प्रारंभ झाला. बुधवार नाक्यावरील तळ्यात साडेबारा वाजता पहिल्या मूर्तीचे विसर्जन झाले. सायंकाळी सर्वच मंडळांकडून लवाजम्यासह विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या या मिरवणुका पाहण्यासाठी राजपथ व कर्मवीर पथावर सातारकरांची गर्दी लोटली होती. पावसाने हजेरी लावूनही भक्तांचा उत्साह जराही कमी झाला नाही.
कल्याणी शाळेजवळील तळ्यात एकूण तीस तर बुधवार नाक्यावरील तळ्यात साठ मूर्ती विसर्जित करण्यात आल्या. दोन्ही तळ्यांवर विजेची व्यवस्था करण्यात आली होती. बुधवार नाक्यावर मूर्तींचे विसर्जन क्रेनच्या माध्यमातून करण्यात आले. पहाटे साडेचार वाजता शेवटच्या मूर्तीचे विसर्जन झाले. विसर्जन मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले होते. सातारा नगरपालिका व पोलीस प्रशासनाने केलेल्या नियोजनामुळे हा सोहळा निर्विघ्न पार पडला.पारंपरिक वाद्यांचाच आवाज..गणेशोत्सवाप्रमाणेच दुर्गोत्सवातही मंडळांकडून पारंपरिक वाद्यांनाच पसंती देण्यात आली. ढोलपथक, झांजपथक हे मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरले. सर्वच मंडळांनी डीजेला पूर्णपणे बगल दिली. मंडळांनी जपलेल्या डीजेविरहित मिरवणुकीचे सातारकरांमधून कौतुक करण्यात आले.
भेटीचा सोहळा...भारतमाता व आईसाहेब या देवींची भेट मिरणुकीचे वैशिष्ट्य ठरले. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दोन्ही देवींची भेट घडवून आणण्यात आली. यावेळी भक्तांकडून देवीचा जयघोष करीत फुलांची उधळण करण्यात आली. ही भेट पाहण्यासाठी आलेल्या भाविकांनी राजपथ बहरून गेला होता.