कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील कुसूर परिसरात घरगुती पाच दिवसीय गणपतींना उत्साहात निरोप देण्यात आला. पर्यावरणाचे प्रदूषण टाळण्याच्या दृष्टीने एका माजी सैनिकाने परसबागेत टपात पाणी घेऊन त्यात मूर्ती विसर्जन करून पर्यावरणपूरक संदेश दिला आहे.
ग्रामीण भागात गणेशमूर्तींचे सार्वजनिक पाणवठ्यावर विसर्जन केले जाते. तलाव, नदी अथवा विहिरीत विसर्जन केले जाते. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आणि हानिकारक कलर असल्याने पाणी प्रदूषित होत आहे. परिणामी अनेक ठिकाणी तलावातील, विहिरीतील पाणी दैनंदिन वापरात व जनावरांसाठी वापरात येते असल्याने आरोग्यासाठी हानिकारक होत आहे.
बामणवाडी येथील माजी सैनिक सर्जेराव देसाई यांच्या पुढाकाराने आणि प्रबोधनामुळे अनेक लोकांनी नैसर्गिक कलर केलेल्या शाडूच्या मातीच्या मूर्तींना लोकांनी पसंती दिली. त्याचबरोबर पारंपरिक मूर्ती विसर्जनाला फाटा देत परसबागेत टपात पाणी घेऊन मूर्तीचे विसर्जन केले आहे. मातीच्या मूर्ती असल्याने काही वेळातच विरघळून गेल्या. त्यानंतर विरघळलेली माती झाडांना घालून गणपती आपल्या परसबागेतच वास करत असल्याची भावना व्यक्त होत असल्याने हा नवा आदर्श सर्वांनी घ्यावा असाच आहे.
(कोट...)
मूर्ती उठावदार दिसण्यासाठी केमिकलमिश्रित पर्यावरणाला हानिकारक कलर वापरला जात आहे. अनेक दिवस पाण्यात राहूनही न विरघळणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती असल्याने पाणी दूषित होत आहेच; पण तलावातील पाणी संपुष्टात आले की या मूर्तींची विटंबणा होताना दिसते. त्यामुळे मातीच्या मूर्तींची प्रत्येकाने स्थापना करून पर्यावरण वाचविणे हे आपले कर्तव्य मानले पाहिजे.
- सर्जेराव देसाई, माजी सैनिक