गणेशोत्सवाला दरवर्षी नवा साज चढतो. अलोट उत्साहात हा उत्सव साजरा करण्यात येतो. त्यातच गत काही वर्षांमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे कल वाढला आहे; मात्र त्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. शाडुच्या मूर्तीची प्रतिष्ठापना, पर्यावरणपूरक आरास तसेच पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जन याबाबत सामाजिक संस्था तसेच शासकीय पातळीवरही जागृती करण्यात येत आहे; मात्र त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. सध्याही प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनविलेल्याच मूर्तींची मोठ्या प्रमाणावर प्रतिष्ठापना केली जाते. पीओपीच्या मूर्ती वजनाला हलक्या तसेच आकर्षक असल्या तरी पर्यावरणाच्या दृष्टीने त्या पूरक नाहीत, असे सामाजिक संस्थांकडून वारंवार सांगितले जाते; मात्र त्याचे म्हणावे तेवढे गांभिर्य सामान्यांमध्ये नाही. या मूर्तींचे वाहत्या पाण्यात विसर्जन करण्यात येते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचे प्रदूषण होते.
पाणी प्रदूषण टाळण्यासाठी कृत्रीम तलाव, जलकुंड, परसबाग तसेच साचलेल्या पाण्यामध्ये मूर्तींचे विसर्जन करण्याचे आवाहन दरवर्षी करण्यात येते. त्याद्वारे पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जन होऊ शकते; मात्र ही बाब गांभिर्याने घेतली जात नसल्यामुळे दरवर्षी प्रदूषणात वाढच होत असल्याचे दिसून येत आहे.
- संजय पाटील
- चौकट
... असे होते पाणी प्रदूषित
१) प्लास्टर ऑफ पॅरिस हा जिप्सम या खनिजापासून तयार झालेला एक पदार्थ असून, त्याला रासायनिक भाषेत कॅल्शियम सल्फेट म्हटले जाते.
२) प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणजेच पीओपी पाण्यामध्ये विरघळत नाही. वर्षानुवर्षे त्याचा लगदा तसाच राहतो.
३) पीओपी मूर्तीवर रासायनिक रंगकाम केलेले असते. हे रंग घातक ठरू शकतात.
४) मूर्तींना वापरल्या जाणाऱ्या रासायनिक रंगांवर चकमक, फेव्हिकॉल, पर्ल पावडर टाकली जाते. जी पाण्यात मिसळते.
- चौकट
पाण्यात मिसळणारे घटक आणि आजार
१) कॉपर सल्फेट : ॲलर्जी
२) ॲल्युमिनिअम प्रोमाईड : कॅन्सर
३) पर्शिअन निट : त्वचाविकार
४) सल्फाईड : कॅन्सर
- चौकट
जलचर जिवांना मोठा धोका
वाहत्या पाण्यात केल्या जाणाऱ्या मूर्ती विसर्जनामुळे जलचर प्राण्यांच्या जिवाला मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण होतो. पीओपीच्या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत. त्याबरोबरच रासायनिक रंग पाण्यामध्ये मिसळतात. या मूर्तींचा लगदा तयार होत असल्यामुळे सूर्यप्रकाश खाली पोहोचत नाही. परिणामी, ही बाब जलचर प्राण्यांसाठी धोकादायक ठरून त्यांचा मृत्यू ओढवतो.
- कोट
गणेशमूर्ती रंगविताना विषारी रासायनिक रंगांचा वापर करण्यास बंदी घालणे गरजेचे आहे. त्याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पर्यावरण सचिवांनी रंग उत्पादक तसेच वापरकर्त्यांना सुचित करावे. दरवर्षी लाखो गणेशमूर्ती तयार केल्या जातात. त्या मूर्ती पाण्यात विसर्जितही केल्या जातात. त्याचा पाण्यावर होणारा परिणाम अभ्यासणे आवश्यक आहे.
- डॉ. सुधीर कुंभार, संचालक
एम. एन. रॉय पर्यावरण संस्था, कऱ्हाड.