कऱ्हाड : लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून शेतकरी अडचणीत आले आहेत. भाजीपाला मार्केट बंद असल्याने शेतीमाल विक्री ठप्प झाली आहे. गत पंधरा ते वीस दिवसांपासून कडक लॉकडाऊन सुरू आहे. आठवडी बाजार बंद आहेत. याशिवाय अत्यावश्यक सेवेतील भाजी मार्केटही बंद आहे. भाजीपाला घरपोच देण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र घरपोच मालाची अपेक्षित विक्री होत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत.
पुलावर अंधार
कऱ्हाड : शहरातील जुन्या कोयना पुलावर असलेले काही पथदिवे बंद पडले आहेत. त्यामुळे पुलावर रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य असते. दुचाकीस्वार, सायकलस्वार तसेच पादचारी या पुलाचा वापर करतात. मात्र, पुलावर अंधार असल्यामुळे रात्री पादचाऱ्यांना या पुलावरून मार्गस्थ होताना जीव मुठीत घेऊन जावे लागते. संबंधित विभागाने पथदिव्यांची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
पिकांचे नुकसान
रामापूर : पाटण तालुक्यातील डोंगरपायथ्याशी असलेल्या शेतीचे वन्य प्राण्यांकडून नुकसान केले जात आहे. रानडुक्कर, वानर, मोर, सायाळ आदी वन्य प्राण्यांकडून पिकांची नासधूस केली जात आहे. वारंवार होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. वन्यप्राण्यांचा वन विभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.
रस्ता खचल्याने धोका
शामगाव : अंतवडी, ता. कऱ्हाड येथील अंतवडी ते मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गाला जोडणारा रस्ता खचला आहे. त्यामुळे या मार्गावर धोका निर्माण झाला आहे. या रस्त्यालगत विहीर आहे. त्या ठिकाणी रस्ता खचला आहे. परिणामी येथे धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. तसेच ठिकठिकाणी पावसाने रस्ता खचला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक करणे धोक्याचे ठरत आहे.