सातारा : अन्न भेसळचे अधिकारी असल्याची बतावणी करून ट्रॅव्हल्समधून सुमारे दोन लाखांचा खवा हातोहात लांबविल्याची घटना लिंबखिंडजवळ दि. २५ रोजी घडली. याप्रकरणी अज्ञात अन्न भेसळच्या तोतया अधिकाऱ्यांवर शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत अधिक माहिती अशी, चालक संतोष पांडुरंग धारगलकर (वय ४०, रा. गोवा) हे मुंबईहून गोव्याला ट्रॅव्हल्स घेऊन निघाले होते. ट्रॅव्हल्सच्या डिकीमध्ये एका व्यापाऱ्याचा सुमारे सव्वादोन लाखांचा खव्याचा माल ठेवला होता. ट्रॅव्हल्स साताऱ्याजवळ आल्यानंतर एका अज्ञात व्यक्तीने चालक धारगलकर यांच्या मोबाईलवर फोन केला.
मला गोवा येथे यायचे आहे. तुमच्या ट्रॅव्हल्समध्ये आमचे मित्र बसले आहेत,असे सांगितले. त्यामुळे चालक धारगलकर यांनी बस बॉम्बे रेस्टॉरंट चौकात थांबविली. संबंधित व्यक्ती ट्रॅव्हल्समध्ये बसल्यानंतर आम्ही फूड डिपार्टमेंटचे कर्मचारी आहोत. तसेच पोलिसांचेही बातमीदार आहोत, अशी बतावणी केली. त्यानंतर संबंधितांनी चालकाला दमदाटी करून पाच हजार रुपये जबरदस्तीने घेतले. हा सर्व थरार धावत्या ट्रॅव्हल्समध्येच घडत होता.खिंडवाडीजवळील एका हॉटेल परिसरात पोहोचल्यानंतर संबंधितांनी चालकाला ट्रॅव्हल्स थांबविण्यास भाग पाडले. कारवाई करत असल्याचे भासवून ट्रॅव्हल्सच्या डिकीतील खाव्याचा माल आम्ही सातारा शहर पोलीस ठाण्यात जमा करतो, असे त्यांनी सांगितले. एका टेम्पोमध्ये ट्रॅव्हल्समधील माल उतरविण्यात आला. त्यानंतर टेम्पोमध्ये माल भरल्यानंतर संबंधितांनी तेथून पलायन केले.चालक धारगलकर यांनी संबंधित लोक खरोखरच सातारा शहर पोलीस ठाण्यात गेले आहेत का, हे पाहण्यासाठी ट्रॅव्हल्स घेऊन शहर पोलीस ठाणे गाठले. मात्र, या ठिकाणी संबंधित अधिकारी पोहोचले नसल्याचे समोर आले. परिणामी आपली फसवणूक झाली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. परंतु तोपर्यंत बराच उशीर झाला होता. पोलिसांनी चार अज्ञात तोतया अधिकाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.