सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले अजिंंक्यतारा येथील संस्मरणीय इतिहास जागता ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. येथे तळीजोड प्रकल्प राबविण्याबरोबरच इतर विकासात्मक कामे व गोडोली तळे सुशोभीकरणासाठी नगरपरिषदेने अंदाजपत्रकात भरीव तरतूद करावी, अशा सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांना केल्या.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आजपर्यंत किल्ले अजिंंक्यताराचा परिसर आणि गोडोली तळ्याचा भाग नगरपरिषदेच्या हद्दीत समाविष्ट नव्हता. तथापि, चार महिन्यांपूर्वी झालेल्या हद्दवाढीत हा परिसर नगरपरिषदेच्या क्षेत्रात आला आहे. त्यामुळे या भागाच्या विकासाची प्राथमिक जबाबदारी नगरपरिषदेची राहणार आहे. त्यामुळेच किल्ला परिसराचा विकास करण्यासाठी कायमस्वरूपी आर्थिक उपाययोजना करायला हव्यात.
किल्ले अजिंक्यतारा हा दीपस्तंभाप्रमाणे सातारकरांना नेहमीच प्रेरणा देत आला आहे. याच किल्ला परिसरातून अटकेपार पोहोचलेल्या मराठा साम्राज्याचा कारभार पाहिला जात होता. या किल्ल्यावर युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचे अल्पकाळ वास्तव्य होते, याचा सार्थ अभिमान सर्व सातारकरांना आहे. शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या किल्ले अजिंंक्यताऱ्याचा विकास साध्य करण्यासाठी नगरपरिषदेने येथील राजसदरेवरून नागरिकांकरिता पहाता येईल, असा लाईट ॲंड साऊंड शो, गडावरील तळी जोड प्रकल्प, आवश्यक तेथे विद्युतीकरण, गडावरील मंदिरांची डागडुजी आणि सुशोभीकरण, वृक्षारोपण आदी कामांसाठी भरीव तरतूद करावी.
तसेच गोडोली तळ्याची निर्मिती तत्कालीन जिल्हाधिकारी आणि समाजसेवक डॉ. अविनाश पोळ यांच्या मार्गर्शनाखाली करण्यात आली आहे. या तळ्याच्या भिंतीवर वॉकिंग पाथवे, तळ्याच्या बाजूने वृक्षारोपण करणे, ओपन जिम आदींसाठी नगरपरिषदेच्या अंदाजपत्रकात भरीव तरतूद करण्यात यावी, अशा सूचना उदयनराजे भोसले यांनी केल्या आहेत.