दहिवडी : दुसऱ्या लाटेमध्ये सातारा जिल्ह्यात पहिल्यांदा हाॅटस्पाॅट ठरलेल्या दहिवडी शहरात कोरोनाने जो उच्छाद मांडला होता. त्याला सलग सोळा दिवस लाॅकडाऊन करून दहिवडीकरांनी संयम पाळला होता व सलग ७ दिवस एकही पॉझिटिव्ह रुग्ण सापडला नव्हता. अशा दहिवडी पॅटर्नची आजही कोरोनाची साखळी तोडण्याची गरज आहे.
राज्यात सर्वात हाॅटस्पाॅट ठरलेल्या सातारा जिल्ह्यातील अनेक शहरे कोरोनाच्या विळख्यात सापडली आहेत, त्यांनी दहिवडी शहराचे अनुकरण करणे गरजेचे आहे.
दहिवडी शहरात दुसऱ्या लाटेमध्ये फेब्रुवारीच्या मध्यावर कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने प्रशासनाने व्यापाऱ्याची बैठक घेऊन २२ पासून सलग तीन दिवसांचा कडक लाॅकडाऊन केला. त्या नंतर प्रांताधिकारी, पोलीस विभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी दहिवडीचे व्यापारी व नगरपालिकेची टीम आरोग्य विभाग यांची बैठक झाली. तालुक्याचे ठिकाण असल्याने गाफील राहून चालणार नाही. त्यामुळे सलग १३ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला. यादरम्यान रोज बैठका होऊ लागल्या. या लॉकडाऊन काळात पोलिसांनी कडक धोरण अवलंबले व विनाकारण फिरणारे मास्क न वापरणारे अशा लोकांवर कारवाई करून ५ लाखांपेक्षा जास्त दंड वसूल केला.
दहिवडी शहराचा नकाशा समोर ठेवून कोरोना पॉझिटिव्ह असलेले हाॅटस्पॉट तयार केले व तब्बल २६ ठिकाणी प्रवेश बंदी कोरोनाबाधित क्षेत्र तयार केले. वाड्या-वस्त्यांवरील लोक शहरात येऊ नयेत, यासाठी सर्व दहिवडी शहराला येणारे रस्ते बंद करण्यात आले.
अत्यावश्यक किराणा दूध भाजीपाला व औषधे दुकानदारांचे नंबर लोकांना देण्यात आले व किराणा दुकानदारांना नगर पंचायतीने केवळ सकाळी दोन तास घरपोच साहित्य देण्यास परवानगी देण्यात आली.
दरम्यानच्या काळात दहिवडी शहरातील सिद्धनाथ मंदिर, चावडी चौक, पुनर्वसन शाळा, सावळकर अभ्यासिका, या ठिकाणी ज्या लोकांना ताप, थंडी, खोकला यासारखी लक्षणे दिसतील त्यांची तपासणीची सोय केली. तसेच सर्वच दुकानदारांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली. त्यानंतर दहिवडी शहरात एक फिरती व्हॅनही सर्व सुविधासहित ठेवण्यात आली.
चौकट...
तालुक्यात ५० पथकांद्वारे सर्वेक्षण...
सुरुवातीला अंगणवाडी सेविका, आरोग्य विभाग, नगरपालिकेचे कर्मचाऱ्यांची २५ पथके तयार करण्यात आली. दहा दिवसांनंतर दहिवडी शहराचा वेग थोडा मंदावू लागला.
त्यानंतर संपूर्ण तालुक्यातील आरोग्य विभागाचे १५० कर्मचारी सोबत घेऊन ५० पथके तयार करून एका दिवसात संपूर्ण दहिवडी शहराचा सर्व्हे करण्यात आला. जवळपास ३००० कुटुंबे १५,७२९ लोकांना भेटी दिल्या. त्यावेळी किरकोळ दोन-तीन लोकं वेगवेगळ्या आजाराचे सापडले होते.
चौकट..
मॉर्निंग वॉकलाही मुरड
दहिवडीकरांनी प्रशासनाच्या ज्या सूचना आल्या. त्या तंतोतंत पाळल्या होत्या. अतिशय संयमाने या परिस्थितीला सामोरे गेले होते. मॉर्निंग वॉकलाही मुरड घातली होती. त्यानंतर सलग सात दिवसांत दहिवडीत एकही रुग्ण सापडला नव्हता तसेच सोळा दिवसांनंतर ही लॉकडाऊन उघडल्यानंतर मास्क व सोशल डिस्टन्सचे पालन न करणाऱ्या लोकांना व्यापाऱ्यांनी माल देऊ नये, अशी ताकीद देण्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव असताना दहिवडी शहर आटोक्यात आहे. या पॅटर्नचे अनेकांनी कौतुक केले होते.
२९दहिवडी
दहिवडी (ता. माण) शहरात हाॅटस्पाॅटच्या ठिकाणी पूर्णपणे नाकाबंदी करण्यात आली होती.