खटाव : तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशानुसार खटाव तालुक्यातील ५० गावांत नियमावली कडक करण्यात आली आहे. या आदेशाची अंमलबजावणी खटाव शहरातही तत्काळ करण्यात आली.
ग्रामपंचायत, दक्षता समिती, भरारी पथक प्रमुख, कृषिविस्तार अधिकारी आप्पासाहेब गौंड, नोडल अधिकारी प्रमोद शेलार, सरपंच नंदकुमार वायदंडे, उपसरपंच अमर देशमुख, पोलीस प्रशासन यांच्या नेतृत्वाखाली येथील दुकानदारांना दुकाने दहा दिवस ग्राहकांसाठी बंद ठेवण्याचे; पण निर्धारित वेळेत साहित्य पोहोच देण्यास मुभा देण्यात आली. तसे तोंडी आदेशही संबंधितांना देण्यात आले. यावेळी येथील दुकानदार ग्राहकांना दुकानात घेऊन साहित्य देत असल्याचे निदर्शनास येताच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. गावातील इतर दुकानदारांना अधिकाऱ्यांनी तोंडी आदेश दिले आहेत. बंदच्या काळात फक्त दूध, दवाखाने व मेडिकल आदी अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याचे संबंधितांनी सांगितले. तसेच गावात कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले असून, याकामी शिक्षकांना तैनात करण्यात आले आहे.
गावातील बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती, हायरिस्क, लो रिस्क, साठ वर्षांवरील इतर आजार असणाऱ्या व्यक्ती आदींची माहिती घेण्यासाठी अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्या सोबत शिक्षकांचीदेखील नेमणूक करण्यात आली आहे.
वाढत्या कोरोनाला थोपविण्यासाठी गावातील लोकांनी अगदी अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडावे व गावाला तसेच प्रशासनास सहकार्य करावे, अन्यथा प्रशासनाच्या आदेशानुसार दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे आवाहन सरपंच नंदकुमार वायदंडे, उपसरपंच अमरसिंह देशमुख खटाव, ग्राम दक्षता समिती खटाव यांच्या वतीने ग्रामस्थांना करण्यात आले आहे.
कॅप्शन :
खटावमध्ये कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करताना आप्पासाहेब गौंड. समवेत सरपंच नंदकुमार वायदंडे, अमर देशमुख व दक्षता कमिटी सदस्य.