सातारा : रयत शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना केंद्रित विद्यापीठाचे कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम अभ्यासण्याची संधी मिळणार आहे. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवणे, शिक्षकांना उच्चतम ज्ञान मिळवून देणे, नवनवीन अभ्यासक्रम आणण्याबरोबरच संशोधनामध्ये परस्परांना सहयोग करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली.रयत शिक्षण संस्था व केंब्रिज विद्यापीठाच्या शिष्टमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक गुरुवारी झाली. या बैठकीसाठी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, केंब्रिज विद्यापीठाचे दक्षिण आशिया विभागाचे कार्यकारी संचालक अर्जुन राजामणी, केंब्रिज विद्यापीठाचे प्रादेशिक व्यवस्थापक व्ही. व्ही. जोशुआ व इंग्रजी विभागाचे दक्षिण आशिया विभाग प्रमुख अमोल नाडकर्णी, रयतचे सचिव विकास देशमुख, महाविद्यालयांचे प्राचार्य यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीमध्ये इंग्रजी संभाषण, शिक्षकांचे अंगभूत कौशल्य विकसन, संशोधन व तंत्रज्ञान अभ्यासक्रम विकसन या चार महत्त्वपूर्ण मुद्द्यावर चर्चा करण्यात आली.
यावेळी बोलताना दळवी म्हणाले, ‘केंब्रिज विद्यापीठ आणि त्याच्या शैक्षणिक परंपरेला साडेआठशे वर्षाचा इतिहास आहे. रयत शिक्षण संस्थेत अभ्यासक्रम चालू करण्याच्या दृष्टीने केंब्रिज विद्यापीठाच्यावतीने रयत शिक्षण संस्थेशी पत्रव्यवहार करण्यात आला. रयत शिक्षण संस्थेचे संपूर्ण महाराष्ट्रात चार लाख ६९ हजार विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा बोलणे, लिहिणे, कौशल्य विकास, शिक्षक कौशल्य प्रशिक्षण विकसन वेगवेगळ्या विषयांमध्ये उत्तुंग पातळीवरचे संशोधन आणि तंत्रज्ञान कौशल्य विकास या चार मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.रयत शिक्षण संस्थेचा शैक्षणिक आणि प्रशासकीय पातळीवर काम करणारा अभ्यास संशोधन गट तयार करून या गटाकडून या प्रशिक्षण कार्यक्रमाचा रोड मॅप तयार केला जाणार आहे. हा अभ्यासक्रम नक्की कोणत्या माध्यमातून कुठल्या फॅकल्टी साठी सुरू करायचा या विषयावर अद्याप चर्चा झालेली नाही. मात्र, या विषयावर लवकरच चर्चा होऊन ती क्षेत्रे निश्चित केली जातील असे दळवी यांनी सांगितले.
आशिया खंडात नावाजलेल्या रयत शिक्षण संस्थेची संख्यात्मक वाढ उत्तम पध्दतीने झाली आहे. संस्थेला गुणात्मक वाढीसाठी संधी आहे आणि केंब्रिज विद्यापीठाच्या माध्यमातून संधी मिळत असेल तर त्याचे सोने केले पाहिजे. प्राथमिक स्तरावर चर्चा सकारात्मक झाली आहे. यापुढील कालावधीत विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार नव्या युगाला अपेक्षित असलेल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मानस आहे. - चंद्रकांत दळवी, चेअरमन, रयत शिक्षण संस्था