सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस अजून कमीच असून, मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनाला ७४, नवजा ११८ आणि महाबळेश्वरला १२९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर कोयना धरणात चार दिवसांत अडीच टीएमसी पाणीसाठा वाढला आहे.
जिल्ह्यात जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सून दाखल झाला. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. पण, पावसात जोर नव्हता. काही वेळा पावसाने दडीही मारली. यामुळे शेतकऱ्यांत चिंता निर्माण झाली होती. तसेच पेरणीची कामेही खोळंबलेली. मात्र, गेल्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात झाली. पूर्व दुष्काळी भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यांत काही ठिकाणी पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणीला सुरुवात केली. तर काही शेतकऱ्यांनी पाऊस पडेल या आशेवर पेरणी उरकली आहे.
त्याचबरोबर पश्चिम भाग हा पावसाचा. पण, गेल्या वर्षीच्या तुलनेत पश्चिमेकडे पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. त्यामुळे पेरणीला अपेक्षित वेग आला नाही. त्याचबरोबर धरणातील पाणीसाठाही वाढला नाही. आता तीन दिवसांपासून चांगला पाऊस पडत असल्याने आशादायी चित्र निर्माण झाले आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागातील कोयना, नवजा, तापोळा, बामणोली, महाबळेश्वर परिसरात यंदा पाऊस कमी आहे. तीन दिवसांपासून पाऊस वाढू लागला आहे. यामुळे धरणसाठ्यात वाढ होत आहे. कोयना धरणात चार दिवसांत अडीच टीएमसीने पाणी वाढले आहे. १ जुलै रोजी कोयनेत १३.६० टीएमसी पाणीसाठा होता. तर १६०० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. मंगळवारी सकाळच्या सुमारास धरणात १६ टीएमसी पाणीसाठा झाला होता. तर धरणात १४ हजार क्युसेक वेगाने पाणी येत होते. पायथा वीजगृहातून १०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. हे पाणी कोयना नदीपात्रात जात आहे.
दरम्यान, मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनाला ७४ तर १ जूनपासून ५२८ मिलीमीटर पाऊस पडला आहे. नवजा येथे १ जूनपासून ६५२ तर महाबळेश्वरला ६४३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पश्चिम भागात पाऊस होत असल्याने भात लावणीलाही वेग येणार आहे.
साताऱ्यात ऊन अन् पाऊस...
सातारा शहरात चार दिवसांपासून पाऊस होत आहे. पण, पावसात जोर नाही. कधी ऊन तर काही वेळा ढगाळ वातावरण तयार होत आहे. त्याचबरोबर कधीतरी पाऊस पडतो. सातारा तालुक्यातही पाऊस जेमतेमच आहे. पेरणी आणि भात लावणीसाठी अजूनही मोठ्या प्रमाणात पावसाची आवश्यकता आहे.