सातारा : लग्न करण्यास नकार दिल्याने एका १६ वर्षांच्या शाळकरी मुलीला चाकूने भोसकल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात घडली. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी ओरिसा राज्यातील एका तरूणाला अटक केली आहे. या घटनेमुळे साताऱ्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. विवेक नरहरी शेट्टी (वय २३ मूळ रा. राज्य ओरिसा, सध्या रा. करंजे पेठ, सातारा) असे अटक करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित १६ वर्षांची मुलगी बुधवार, दि. २३ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता अपार्टमेंटच्या टेरेसवर अभ्यास करत होती.
त्यावेळी विवेक हा तेथे गेला. ‘तुझे माझ्यावर प्रेम आहे का, मला आता सांग आणि तू माझ्याबरोबर लग्न करणार आहेस का नाही ते पण सांग.’ असे त्याने पीडित मुलीला विचारले. यावर मुलीने ‘अजून मी लहान आहे. मला अजून शिकायचे आहे. माझ्या आई-वडिलांना असे काही केलेले आवडणार नाही. म्हणून मी तुझ्याबरोबर लग्न करू शकत नाही,’ असे उत्तर दिले. त्यामुळे चिडून जाऊन विवेक शेट्टीने तिला जवळ ओढून तिच्या गळ्यावर आणि पोटात चाकूने भोसकले.
मुलीने आरडाओरड केल्याने अपार्टमेंटमधील नागरिक तिच्या मदतीसाठी धावून आले. तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर नातेवाईकांनी तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. दोन दिवस पीडित मुलीची प्रकती चिंताजनक होती. तिच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर पोलिसांनी तिचा जबाब नोंदविला. शनिवार, दि. २६ राेजी मध्यरात्री शाहूपुरी पोलिसांनी विवेक शेट्टीवर खुनाचा प्रयत्न करणे, पोक्सो, विनयभंग, आत्महत्येचा प्रयत्न करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला.
‘त्याने’ स्वत:वरही केले वारविवेकने पीडित मुलीवर चाकूने वार केल्यानंतर स्वत:च्या गळ्यावर आणि हातावरही त्याने वार केले. मात्र, यामध्ये तो गंभीर जखमी झाला नाही. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते. दोन दिवसांत त्याच्यावर उपचार पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. गेल्या चार वर्षांपूर्वी विवेक हा त्याच्या भावासोबत प्लंबिंग काम करण्यासाठी साताऱ्यात आला आहे.