वडूज: पाचवड (ता. खटाव) येथील यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यतीत आखलेला फाटी (ट्रक) पूर्ण केल्यानंतर बैलगाडाचालक खाली पडला, त्याचा गाडीवरील ताबा सुटल्याने बैलगाडा विहिरीत पडल्याने दोन बैलांचा मृत्यू झाल्याची माहिती खटावचे नायब तहसीलदार रविराज जाधव यांनी दिली.पाचवड (ता. खटाव) येथील जोतीबा यात्रेनिमित्त प्रशासनाकडून रीतसर परवानगी घेऊन बैलगाड्यांच्या शर्यतीचे आयोजन केले होते. त्यानुसार शनिवारी बैलगाड्यांच्या शर्यती सुरू होत्या. सुमारे चार वाजता एका बैलगाडीने शर्यत पूर्ण केल्यानंतर बैलगाडा पुढे गेला. त्यात चालक खाली पडून त्याचा बैलावरील ताबा सुटला. त्यानंतर बैलगाडा सैरावैरा धावत विखळे हद्दीतील औतडवाडीतील विहिरीत पडल्याने दोन्ही बैलांचा मृत्यू झाला. त्यानंतर संबंधित मालकाने बैलांना वर काढीत बैलगाडा ताब्यात घेतला. या घटनास्थळी खटावचे नायब तहसीलदार रविराज जाधव दाखल झाले. या घटनेनंतर बैलगाडा शर्यती रद्द करण्यात आल्या.
शर्यतीतील बैलांचा विहिरीत पडून मृत्यू; साताऱ्यातील दुर्देवी घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2022 12:04 AM