सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाने जोरदार मुसंडी मारत १६८ गावांचा कारभार हाती घेतला आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडे १२० हून अधिक गावांची सत्ता आली आहे. काही ठिकाणी स्थानिक आघाड्यांनी वर्चस्व राखले असले तरी जिल्ह्यात भाजपची ताकद वाढत आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससाठी आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे.जिल्ह्यातील ३१९ ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली हाेती.
ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान पार पडले, तर मंगळवारी सर्व तालुक्यांच्या ठिकाणी मतमोजणी पार पडली. यामध्ये भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाने वर्चस्व मिळविल्याचे स्पष्ट झाले. या गटाने १६८ गावांत सत्ता काबीज केली. यामध्ये शिंदे गट वरचढ ठरला आहे. कारण, पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींत सत्ता काबीज करताना राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धोबीपछाड दिली. देसाई गटाने अनेक महत्त्वाच्या ग्रामपंचायतींची सत्ता हस्तगत केली आहे, तर कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे हेही शिंदे गटाचे आहेत. कोरेगाव तालुक्यात राष्ट्रवादीला २४ गावांत सत्ता घेता आली, तर शिंदे गटाने १४ ठिकाणी यश मिळवले. भाजपला ६ गावांचा कारभार हाती घेता आला.
साताऱ्याचे दोन्ही राजे भाजपमध्ये आहेत. गट वेगळे असले तरी तालुक्यात भाजपने ३० हून अधिक ग्रामपंचायतींत निर्विवादपणे सत्ता हाती घेतली. मनोज घोरपडे हेही भाजपचे असून, त्यांनीही काही ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत. सातारा तालुक्यात राष्ट्रवादीचे कमी अस्तित्व दिसून आले, तर शिवसेनेच्या शिंदे गटानेही ५ हून अधिक ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत. सर्वाधिक जागा शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मिळविल्या. वाई तालुक्यात राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांच्याकडे तीन ग्रामपंचायती आल्या असून, भाजपला एका ग्रामपंचायतीत सत्ता मिळवता आली. माजी आमदार मदन भोसले यांचे गाव असणाऱ्या भुईंज ग्रामपंचायतीचा सरपंच भाजपचा झाला आहे. यामुळे भोसले यांचे वर्चस्व राहिले आहे.
फलटणला राजे गटच दिसून आला. २० गावांत राजे गटाने सत्ता मिळवली, तर भाजपला दोन ग्रामपंचायती ताब्यात घेता आल्या. जावळी तालुक्यात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यामुळे भाजप पक्ष तुल्यबळ ठरला. भाजपची १४, तर राष्ट्रवादीची एका ठिकाणी सत्ता आली. खटाव तालुक्यात राष्ट्रवादीला अधिक ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवता आले. यामध्ये महत्त्वाच्या मायणी ग्रामपंचायतीचा समावेश आहे. या ठिकाणी सत्तांतर झाले आहे. महाबळेश्वर तालुक्यात शिवसेनेच्या शिंदे गटाला ५, तर ठाकरे गटाला एक ग्रामपंचायत ताब्यात घेता आली. खंडाळ्यात दोन्ही ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचा वरचष्मा राहिला.
माण तालुक्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे आणि राष्ट्रवादीमध्ये खरा संघर्ष झाला. यामध्ये भाजपने राष्ट्रवादीला धक्का देत १६ ग्रामपंचायतींवर झेंडा फडकवला. राष्ट्रवादीला ८ ग्रामपंचायती जिंकता आल्या. तालुक्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाला २ ग्रामपंचायतींत सत्ता मिळवता आली. कऱ्हाड तालुक्यात काँग्रेस पक्ष क्रमांक एकचा ठरला. १५ ग्रामपंचायतींत पक्षाची सत्ता आली. राष्ट्रवादी १३ आणि भाजपला ८ ग्रामपंचायतींत शिरकाव करता आला. जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतीत स्थानिक आघाडीत निवडणूक झाली. इतर काही पक्ष एकत्र येऊनही निवडणूक लढविण्यात आली. त्यामुळे काही ग्रामपंचायतींवर आघाडीनेही वर्चस्व मिळविले आहे.