लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा शहर आणि परिसराला बुधवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास वळवाच्या पावसाने झोडपून काढले. विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात जवळपास पाऊण तास पाऊस पडत होता. यामुळे रस्त्यावरून पाणी वाहू लागले, तर रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांची तारांबळ उडाली. तर मंगळवारी फक्त साताऱ्यात पाऊस झाला नाही. मात्र मागील आठवड्यात सहावेळा वळीवाने हजेरी लावली आहे. पावसामुळे उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
फलटण शहर परिसरामध्ये देखील सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास वादळी वारे आणि विजांच्या कडडाटासह पाऊस सुरु झाला. यामुळे परिसरातील वीज गेली होती.
सातारा जिल्ह्यात एप्रिल महिना सुरू झाल्यापासून उन्हाची तीव्रता वाढली होती. त्याचबरोबर उकाड्यातही कमालीची वाढ झालेली. त्यातच अधूनमधून ढगाळ वातावरणही तयार व्हायचे. त्यामुळे पावसाळा पोषक वातावरण तयार होत होते. याची सुरुवात मागील गुरुवारपासून झाली. त्यावेळी गुरुवारी जिल्ह्यातील मान, खटाव, पाटण आणि महाबळेश्वर तालुक्यात पावसाने हजेरी लावली. तर पाटण तालुक्यातच एका ठिकाणी वीज पडण्याची घटना घडली होती. सातारा शहरातही पाऊस झाला होता. आठ दिवसाचा विचार करता सातारा शहरात सहा दिवस पाऊस पडलेला आहे. तर जिल्ह्यात दररोज कोणत्या कोणत्या भागात वळवाचा पाऊस हजेरी लावत आहे. यामध्ये अधिक करून गाराच अधिक पडतात. परिमेय शेती पिकांचे आणि फळबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. ८ एप्रिलपासून आतापर्यंत सुमारे सात कोटी रुपयांचे पिके आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. असे असतानाच पाऊस आणखी पाठ सोडण्यास तयार नाही. बुधवारीही जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला. तसेच सातारा शहरातही जोरदार हजेरी लावली.
सातारा शहर आणि परिसरात बुधवारी सकाळपासूनच उकाडा तीव्र होता. बारानंतर अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. त्यामुळे पाऊस लवकरच पडणार असा अंदाज होता. दुपारी चारच्या सुमारास सातारा शहर आणि परिसरात आभाळ भरून आले. त्याचबरोबर ढगाचा गडगडाट सुरू झाला. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. प्रारंभी पावसाचे मोठमोठे थेंब पडू लागले. त्यानंतर बघता बघता पावसाने जोर धरला. सुमारे पाऊण तास पाऊस पडत होता. त्यामुळे रस्त्यावर पाणी वाहू लागले. तर खरेदीसाठी बाहेर पडलेल्या सातारकरांची त्रेधातिरपीट उडाली. छोट्या विक्रेत्यांचेही नुकसान झाले. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला.
आंब्याचे नुकसान... सातारा शहरात अनेक ठिकाणी नागरिकांनी आंब्याची झाड लावली आहेत. तसेच रस्त्याच्या बाजूलाही झाडे आहेत. वारे आणि पावसामुळे आंबे गळून खाली पडत आहेत. बुधवारीही पावसामुळे आंबे खाली पडले. परिणामी आंब्याचे नुकसान झाले.