सातारा : जिल्ह्याच्या पश्चिमेकडे पावसाने दाणादाण सुरू असल्याने दरडप्रवण गावातील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आता जिल्हा परिषद प्रशासनही सतर्क झाले असून अतिवृष्टी तसेच दरडप्रवणीमधील ग्रामसेवकांना मुख्यालय सोडू नये, तर गटविकास अधिकाऱ्यांना धोकादायक गावांना भेटी देण्याची सूचना केली आहे. यामुळे जिल्हा परिषदही अॅक्शन मोडवर असल्याचे स्पष्ट झाले आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात मागील आठवड्यापासून धुवाॅंधार पाऊस पडत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर अतिवृष्टीने काही भागात दरडी कोसळण्याचा धोका आहे. त्यामुळे प्रशासनाने आतापर्यंत जवळपास ५०० कुटुंबांना तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरित केले आहे. तर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. तसेच आता जिल्हा परिषद प्रशासनही अॅक्शन मोडवर आले आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सतर्क केले आहे. यासाठी ३१ आॅक्टोबरपर्यंत गटविकास अधिकाऱ्यांच्या अखत्यारितीतील सर्व विभागांचे नियंत्रण कक्ष हे २४ तास कार्यरत ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच सर्व ग्रामसेवकांना मुख्यालयी राहवे लागणार आहे. तर अतिवृष्टी आणि दरडप्रवण क्षेत्रातील सर्व ग्रामसेवकांना कोणत्याही परिस्थितीत मुख्यालय सोडू नये, अशी स्पष्ट सूचनाच करण्यात आली आहे.
दरडप्रवणमधील ग्रामसेवक मुख्यालयी; गटविकास अधिकारी आपत्ती गावी
By नितीन काळेल | Published: July 25, 2023 7:09 PM