वडूज : सातेवाडी येथे ग्रामस्थांनी लोकसहभागातून आयसोलेशन सेंटर सुरू केले आहे. त्याचे उद्घाटन परिविक्षाधीन प्रांताधिकारी जनार्दन कासार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तहसीलदार किरण जमदाडे, गटविकास अधिकारी रमेश काळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युनूस शेख, डॉ. संतोष मोरे, उपसरपंच भाऊसाहेब बोटे, पोलीस पाटील विजया माने, तलाठी सुनील सत्रे तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.
सातेवाडी येथे काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. धावाधाव करूनही येथील एका रुग्णाला ऑक्सिजनअभावी जिवाला मुकावे लागले. ही बाब गावकऱ्यांना खटकू लागली. त्यामुळे किमान आपल्या गावातील रुग्णांना तरी वेळेत ऑक्सिजन मिळावा, अशी गावकऱ्यांत चर्चा झाली. सरपंच वृषाली व त्यांचे पती विक्रम रोमन यांनी पुढाकार घेतला. ग्रामस्थांमध्ये चर्चा विनिमय झाल्यानंतर गावातील ग्रामस्थांनीही पाठबळ दिले.
ग्रामस्थांनी आयसोलेशन सेंटरसाठी कॉट, गाद्या, बेडशिट, सॅनिटायझर, मास्क आदी साहित्य लोकसहभागातून आणले. येथील जिल्हा परिषद शाळेत आयसोलेशन सेंटर सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी पाच ऑक्सिजन बेड व दहा आयसोलेशन बेड उपलब्ध करण्यात आले आहेत.
येथील मयूर बबन बोटे हे मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) याठिकाणी आहेत. गावात आयसोलेशन सेंटर सुरू करत असल्याचे त्यांना समाजमाध्यमातून समजल्यानंतर त्यांनी सहकार्य केले. रोहित रोमन हे लष्करात सेवेत असणारे जवान गेल्या काही दिवसांपूर्वी सुट्टीनिमित्त गावी आले आहेत. त्यांनीही मदत केली. या आयसोलेशन सेंटरचे लोकार्पण करण्यात आले.
प्रांताधिकारी कासार म्हणाले, ‘वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांमुळे प्रशासन व आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येत आहे. अनेक रुणांना वेळेत ऑक्सिजन बेड मिळत नाहीत अशा काळात रुग्णाला तात्पुरत्या स्वरूपात ऑक्सिजन व आयसोलेशनची सोय या सेंटरचा माध्यमातून करण्यात आली आहे. सातेवाडी ग्रामस्थांनी सुरू केलेली ही संकल्पना स्तुत्य असून अन्य गावांनीही याचा आदर्श घ्यावा.’
सरपंच वृषाली रोमन म्हणाल्या, ‘वाढत्या कोरोनाबाधित रुग्ण संख्येमुळे प्रशासन यंत्रणेवर ताण येत आहे. रुग्णांना वेळेत ऑक्सिजन मिळत नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे रुग्णांना किमान काही काळापुरता तरी ऑक्सिजन मिळावा, त्यांना जीवनदान मिळावे यासाठी गावामध्ये ग्रामस्थांच्या सहकार्यातून व लोकसहभागातून आयसोलेशन सेंटर सुरू करण्यात आले आहे.’