कऱ्हाड : येथील प्रीतीसंगम बागेतील पोलीस चौकीचे उद्घाटन थाटात पार पडले. याठिकाणी कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी कार्यरत राहणार असल्यामुळे बागेतील युवकांच्या हुल्लडबाजीला तसेच धुमस्टाईल दुचाकीस्वारांना चाप बसणार आहे.माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, सहकार व पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस चौकीचे उद्घाटन झाले. कऱ्हाड ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंदराव खोबरे, कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बी. आर. पाटील, माजी नगराध्यक्ष रोहिणी शिंदे, नगर अभियंता मुरलीधर धायगुडे उपस्थित होते.शहरातील प्रीतीसंगम बागेत पोलीस चौकीची गरज निर्माण झाली होती. याठिकाणी अनेक वेळा विक्रेत्यांमध्ये वादावादीचे प्रसंग घडत होते, तसेच हुल्लडबाज युवकांकडून महिला व युवतींना नाहक त्रास दिला जात असल्याच्या घटना घडल्या होत्या. बागेच्या परिसरात वाहतूक व्यवस्थेचाही प्रश्न निर्माण झाला होता. कुठेही आणि कशीही वाहने पार्क केली जात असल्यामुळे नागरिकांना त्याचा मनस्पात सहन करावा लागत होता; मात्र आता पोलीस चौकी कार्यरत झाल्यामुळे हे सर्व प्रश्न निकाली निघण्याची शक्यता आहे.
प्रीतीसंगम बागेतील हुल्लडबाजीला बसणार चाप! आता चोवीस तास पोलीस तैनात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 5:17 PM