सातारा : समाजातील जाती-भेदाच्या भिंती दूर होण्यासाठी आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपयांचे अर्थसहाय करण्यात येते. मात्र, शासनाकडून निधी वेळेत मिळत नसल्याने लाभ लवकर मिळत नाही. पण, नुकताच ४८ लाखांचा निधी मंजूर झाला असून यातून ९६ प्रेमींना लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत माहिती अशी की, समाजात अनेक चालीरीती आहेत. तसेच विविध जाती आहेत. समाजातील जाती-पातीच्या भिंती दूर करण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यात येतात. यासाठी शासनाचेही आर्थिक बळ मिळते. त्यामुळे आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्यांना केंद्र आणि राज्य शासनाच्या हिश्श्यातून ५० हजार रुपयांचे अर्थसहाय करण्यात येते. यामध्ये दोघांचाही हिस्सा प्रत्येकी ५० टक्के असतो.
जिल्हास्तरावरून ही मदत करण्यात येते. यासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे प्रस्ताव दाखल करावा लागतो. त्यानंतर दाम्पत्यांना अर्थसहाय करण्यात येते. मात्र, शासनाकडून निधी वेळेवर मिळत नाही. त्यामुळे प्रस्ताव दाखल करणाऱ्यांना सतत विचारणा करावी लागते. तसेच हेलपाटे मारण्याची वेळ येते. तर सातारा जिल्ह्यात आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यांनी लाभासाठी अर्ज केले होते. त्यातील ९६ दाम्पत्यांना लाभ मिळणार आहे. यासाठी ४८ लाख रुपयांचे अनुदान मंजूर झालेले आहे. याबाबत लवकरच विविध प्रक्रिया पार पाडून जून महिन्यापर्यंत संबंधितांना योजनेचा लाभ देण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे.
योजनेचा लाभ यांना मिळतो..आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्याला प्रोत्साहनपर अर्थसहाय करण्यात येते. यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, भटक्या जाती, जमाती या संवर्गातील एक आणि सवर्ण हिंदू, जैन, लिंगायत, बौद्ध, शीख यापैकी दुसरी व्यक्ती यांनी विवाह केल्यास ते योजनेस पात्र ठरतात. तर २००४ पासून मागासवर्गीय अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती या आंतरप्रवर्गातील विवाहितांनाही याचा लाभ मिळत आहे.