फलटण : फलटण शहरातील महावितरण कंपनीच्या वायरमनला (प्रधान तंत्रज्ञ) १ हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. कार्तिकीस्वामी तुकाराम गुरव (सध्या रा. शासकीय निवास स्थान एमएसईबी कॉलनी फलटण, मूळ रा. मु. पो. पिंगुरी, ता. पुरंदर, जि. पुणे ) असे या वायरमनचे नाव आहे. सलग तिसऱ्या वर्षी महावितरणच्या कर्मचाऱ्यास लाच घेताना अटक झाल्याने फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.याबाबत माहिती अशी की, काल, मंगळवारी (दि. ८) महाराष्ट्र राज्य वीजवितरण कंपनी कार्यालय फलटण येथील अर्बन शाखा नं. १ फलटण याठिकाणी वायरमन कार्तिकीस्वामी गुरव काम करतात. गुरव याने संबंधित तक्रारदारांकडे जुने मीटर काढून नवीन मीटर जोडणीसाठी १ हजारांची लाचेची मागणी केली होती.संबंधित वायरमन तक्रारदार यांच्याकडून १ हजार रुपये लाच फलटण शहरातील हॉटेल आर्यमान येथे स्वीकारल्यानंतर त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा यांनी रंगेहाथ पकडले. संबंधित वीजवितरण कर्मचाऱ्याच्या विरुद्ध फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
महावितरणचा वायरमन हजाराची लाच घेताना जाळ्यात, फलटण तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2022 5:00 PM