बेलदरे गावाला आगारातून सोडल्या जाणाऱ्या एसटी वेळेत जात नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अचानक एसटीची फेरी रद्द केली जाते. त्यामुळे त्याचा फटका महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींना सहन करावा लागत होता. याबाबतची तक्रार विद्यार्थिनींनी आगारातील कर्मचाऱ्यांकडे केल्यानंतर त्यांना उद्धटपणे उत्तरे मिळत होती. या प्रकारानंतर विद्यार्थिनींनी हिंदू एकता आंदोलन समितीचे पाटण तालुका अध्यक्ष तुषार ऊर्फ गणेश पाटील यांची भेट घेऊन आपले प्रश्न मांडले. त्यानंतर हिंदू एकता आंदोलन समितीच्या पदाधिकारी व विद्यार्थ्यांनी आगार व्यवस्थापक यांची भेट घेतली. एसटी वेळेत सोडण्याबाबत व उद्धटपणे बोलणाऱ्या कर्मचाऱ्यांना ताकीद देण्याबाबतची मागणी त्यांनी लेखी निवेदनाद्वारे व्यवस्थापकांकडे केली. यावर व्यवस्थापकांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. भविष्यात जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. तालुकाध्यक्ष गणेश पाटील, भूषण जगताप, नानासाहेब पिसाळ, केदारनाथ ग्रुपचे अध्यक्ष अजित जाधव यांच्यासह विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
बेलदरेतील विद्यार्थ्यांची एसटीअभावी गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 4:39 AM