फलटण : फलटण, माण व खटाव तालुक्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने तेथे बेड व ऑक्सिजनची सुविधा तातडीने वाढवून द्यावी, अशी मागणी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केली आहे.
फलटण, माण, खटाव तालुक्यांतील सध्याच्या कोरोना परिस्थितीवर अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्या दालनात खा. रणजितसिंह नाईक- निंबाळकर, आ. जयकुमार गोरे यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, सरचिटणीस विठ्ठल बलेशवार हे उपस्थित होते.
कोरोनासारख्या वैश्विक महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शासकीय यंत्रणेने प्रभावी काम करायला हवे. दुष्काळी तालुक्यात बेड व ऑक्सिजन, व्हेंटिलेटर वाढवणे गरजेचे आहे, तसेच लसीकरण मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे. रेमडिसिविर इंजेक्शन इतर तालुक्यांपेक्षा दुष्काळी तालुक्यांना कमी मिळत आहे. त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. जे डॉक्टर सरकारी नियमापेक्षा बिल जादा आकारात आहेत, त्यांचेही ऑडिट होणे गरजेचे आहे, अशी मागणी खा. रणजितसिंह नाईक- निंबाळकर व आमदार गोरे यांनी केली.
यावेळी भाजपा सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, नगरसेवक अशोकराव जाधव, अभिजित नाईक निंबाळकर, सातारा तालुका भाजप अध्यक्ष राजेंद्र इंगळे, सरचिटणीस राहुल शिवनामे, वैद्यकीय सेवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष अप्पा कदम, सचिन शिंदे उपस्थित होते.