सातारा : बाजारात मागणी अधिक आणि आवक कमी असल्याने कांदा दराने वर्षानंतर चांगलीच उसळी घेतली आहे. महिन्यात तिप्पट वाढ झाली आहे. तर सातारा आणि लोणंद बाजार समितीत चांगल्या कांद्याला क्विंटलला साडे पाच ते सहा हजारांपर्यंत भाव येत असून बाजारात किरकोळ विक्री ६० रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही फायदा होत आहे. कांदा हे नगदी पीक आहे. तसेच कांदा नाशवंत म्हणून ओळखला जातो. सातारा जिल्ह्यातील शेतकरी विविध हंगामात कांदा पीक घेतात. आज जिल्ह्यात शेकडो हेक्टरवर कांदा पीक घेण्यात येते. तसेच जिल्ह्यात लोणंद ही कांद्याची मोठी बाजारपेठ आहे. पण, गेल्या काही वर्षांत सातारा आणि फलटणच्याही बाजार समितीत कांद्याची आवक चांगली वाढली आहे. मागील सहा महिने कांद्याला कमी भाव येत होता. पण, मान्सूनचा अपुरा पाऊस आणि काही ठिकाणी कांदा खराब झाल्याने सध्या बाजारात आवक कमी आहे. त्या तुलनेत मागणी वाढलेली आहे. त्यामुळे कांद्याचा दरात मोठी वाढ झाली आहे. एका महिन्यात कांदा दरात तिप्पट वाढ झाल्याचे दिसून आले आहे.सातारा बाजार समितीत शुक्रवार वगळता दररोज कांद्याची आवक होते. दररोज सरासरी २०० ते ३०० क्विंटल कांदा येतो. बाजार समितीत १२ आॅक्टोबरला चांगल्या कांद्याला क्विंटलला २२०० ते २७०० रुपयांपर्यंत दर मिळाला होता. पण, तीन दिवसांपूर्वी रविवारी ५२०० पर्यंत भाव पोहोचला. तसेच कांद्याची विक्रमी ६७५ क्विंटलची आवक झाली. अवघ्या १५ दिवसांतच सातारा बाजार समितीत कांद्याच्या दरात दुप्पट वाढ झाल्याचे दिसून आले. यामुळे शेतकऱ्यांनाही फायदा होत आहे. तर भाजी मंडई आणि आठवडी बाजारातही कांद्याचा किलोचा दर ५० ते ६० रुपयांपर्यंत गेला आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे.
लोणंदला ५९०० दर...खंडाळा तालुक्यातील लोणंद बाजार समिती ही कांद्यासाठी प्रसिध्द आहे. याठिकाणी साताऱ्याबरोबरच पुणे जिल्ह्यातूनही कांदा विक्रीसाठी येतो. या बाजार समितीतही कांद्याची आवक कमी आहे. त्यामुळे चांगल्या कांद्याचा क्विंटलचा दर ५८०० ते ५९०० पर्यंत पोहोचला आहे. याठिकाणी सोमवार आणि गुरुवारी कांदा बाजार असतो. सरासरी दोन ते अडीच हजार क्विंटल कांद्याची आवक होते.
फलटणला ४५०० भाव...फलटण बाजार समितीतही साताऱ्याबरोबरच शेजारील बारामती तालुक्याच्या काही भागातून कांदा विक्रीस आणतात. याठिकाणी मंगळवारी सर्वाधिक कांदा येतो. चांगल्या कांद्याला क्विंटलला ४५०० पर्यंत दर मिळत आहे. मागणीनुसार पुरवठा नसल्याने दरात वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. आठवड्याला साधारणपणे तीन ते चार हजार क्विंटल कांदा येत असतो.
दोन महिनेतरी दर राहणार...दर कमी आणि पाऊस अपुरा असल्याने लागण कमी झाली होती. त्यामुळे सध्या घरातील आणि चाळीतील कांदा बाजारात येत आहे. तसेच नवीन हळवा कांदा लागण सुरू आहे. हा माल तीन महिन्यानंतर बाजारात येणार आहे. त्यामुळे जानेवारीनंतर दरात उतार येईल, असा अंदाज आहे. तरीही केंद्र शासनाने काही निर्णय घेतले तर दरात उतार येऊ शकतो.