सातारा : फलटण तालुक्यात टंचाई वाढत असून सासवड (झणझणे) येथे वर्षापासून टँकर आहे. लोकांना माणसी अवघे २० लिटरच पाणी मिळत आहे. त्यामुळे शाैचालय वापरण्यावरही मर्यादा आलीय. त्यातच जादा टँकरही मिळाला नसल्याने विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. तर गावात पाण्याच्या १४ टाक्या असल्या तरी ठणठणाट आहे. कंत्राटदारांवरील मेहेरबानीसाठीच योजना राबविल्याचा आरोपही होत आहे.फलटण तालुक्याच्या पश्चिम भागातील सासवड गाव. लोकसंख्या पाच हजारांच्या आसपास. गेल्यावर्षी पाऊस कमी झाला. तर गावाला १४ जूनपासून टँकर सुरू झाला तो आजही बंद नाही. गावात पाणीपुरवठा करण्यासाठी जवळपास १४ टाक्या बांधण्यात आल्या आहेत. यातील अनेक टाक्यांत पाणीच कधी पडले नाही, असे ग्रामस्थच सांगतात. तर गावाला तीन विहिरींतून पाणीपुरवठा होतो.भारत निर्माण, राष्ट्रीय पेयजल योजनाही आहेत; पण सध्यातरी याचा काहीच फायदा होत नाही. कालव्याला पाणी आले तरच पेयजल योजना सुरू राहते. गावात पाण्यासाठी आणखी एक टाकी बांधण्यात येत आहे; पण गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी उद्भव स्त्रोतच माहीत नाही मग टाक्या आणि योजना करून काय फायदा, असा प्रश्न उपस्थित होत आहे; तसेच एवढ्या पाणी योजना आणि टाक्या म्हणजे अधिकारी आणि कंत्राटदारांचीच मिलीभगत असल्याचा आरोपही ग्रामस्थ करू लागलेत.
गावाला सध्या ५५ हजार लिटर पाणी मंजूर आहे. टँकरद्वारे माणसी २० लिटर, मोठ्या जनावरांना ३५ आणि लहान जनावरांना १० लिटर याप्रमाणे पुरवठा होतोय. हे पाणीही पुरेसे होत नाही. यासाठी गावाने एक लाख लिटर पाणी मिळण्यासाठी मागणी केली आहे. त्यासाठी प्रशासनाला निवेदन देण्यात आले तरीही त्यावर निर्णय झालेला नाही. त्यामुळे लोकांना विकत पाणी घ्यावे लागते. यासाठी खासगी टँकरमधून पाणी घ्यायचे झाल्यास १२०० रुपयांना ५ हजार लिटर पाणी मिळत आहे. त्यातच गावात जलशुद्धीकरण प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठीही विकत पाणी घेण्याची वेळ आलेली आहे.
चारा डेपोची मागणी धूळखात..सासवडमध्ये पाण्याचाच प्रश्न नाही, तर चाराटंचाईही तीव्र आहे. खरीप आणि रब्बी हंगामही आला नाही. त्यामुळे जनावरांना चारा मिळणे अवघड झाले आहे. जनावरांसाठी चारा डेपो सुरू करण्याची मागणीही प्रशासनाकडे करण्यात आली. प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी पाहणीही केली; पण पुढे काहीच झाले नाही.
मका आणला इंदापुरातून; १५ जणांचा रोजगारही गेला..गावातील एक शेतकरी मुरघास तयार करून विकतो. यासाठी तेथे १५ मजूर काम करायचे. जवळपास चारा नसल्याने मुरघास तयार करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील इंदापूरमधून मका विकत आणून मुरघास तयार केला; पण आता चाराच नाही. त्यामुळे मजुरांनाही काम राहिले नाही; तसेच जनावरांसाठी फलटणच्या कॅनाॅल भागातून ३८०० ते ४ हजार रुपये टनाने ऊस आणावा लागतोय. शेतकऱ्यांचा खर्च पाणी आणि जनावरांवरच होऊ लागला आहे.