नागठाणे : ग्रामपंचायत बोरगाव यांच्यावतीने गावामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही उपाययोजना केली नसल्यामुळे बोरगाव येथील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढून ९० पर्यंत झाली आहे.
बोरगाव (ता. सातारा) येथील माजी सरपंच नितीन घाडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार २८ मार्चदरम्यान गावात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यावेळी सरपंच, सर्व सदस्य आणि ग्रामसेवकांनी ही बाब गांभीर्याने घेणे गरजेचे होते. त्यावेळेपासून गावात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गावामध्ये शासन नियमाप्रमाणे संभाव्य उपाययोजना करणे गरजेचे होते. परंतु, सरपंच सर्व सदस्य, ग्रामसेवक तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने न घेता कोणतीही ठोस उपाययोजना न केल्यामुळे आजमितीस बोरगाव येथे कोरोना बाधितांची संख्या नव्वदीच्या घरात पोहोचली आहे. यामध्ये आजपर्यंत चार कोरोनाबधित रुग्ण दगावले आहेत. याबाबत ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य तसेच ग्रामसेवकांनी अजूनही याची दखल घेतली नाही. तसेच गावामध्ये हायपोक्लोराईड फवारणीसुद्धा केली नाही. तसेच वेळोवेळी प्रशासनाने सांगितलेल्या कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अलीकडच्या काळात सरपंच, काही सदस्य आणि लेखनिक कोरोनाबाधित असल्यामुळे ग्रामसेवकांनीही १४ दिवस होऊन गेले तरीही अजूनही होम क्वाॅरंटाईन होणे पसंत केले आहे. त्यामुळे गावामध्ये कोणतीही उपाययोजना अमलात येत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे गावातील कोरोना रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. याबाबत बोलताना माजी सरपंच नितीन घाडगे यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून सर्व घटना उघड केल्यानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांना घटनेची माहिती देऊन बोरगाव येथे सर्वतोपरी उपाययोजना करण्याच्या तसेच लसीकरण कार्यक्रम राबविण्यात यावा, अशा सूचना दिल्या.
चाैकट..
लसीकरण होणे गरजेचे
गावामध्ये लसीकरण होणे गरजेचे असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने याची योग्य दखल घेऊन गावामध्ये त्वरित उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. नाहीतर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. तसेच या घटनेस ग्रामसेवक तसेच गावातील ग्रामसुरक्षा आपत्ती व्यवस्थापन समिती सर्वस्वी जबाबदार आहे.
कोट..
जिल्हा प्रशासनाने बोरगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सोबत ग्रामसुरक्षा आपत्ती व्यवस्थापन समिती यांची चौकशी करून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती अधिनियम अंतर्गत योग्य ती कारवाई करावी.
-नितीन घाडगे, माजी सरपंच