सातारा : अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलिसांनी व्हॉट्सअॅप ग्रुपवर करडी नजर ठेवली असून, कोणीही आक्षेपार्ह कमेंट्स करू नयेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.येत्या काही दिवसांत सर्वोच्च्य न्यायालयाकडून रामजन्मभूमी आणि बाबरी मस्जिदचा निकाल लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. ग्रुप अॅडमीन म्हणून असणाऱ्यांना सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आक्षेपार्ह फोटो, व्हिडीओ क्लिप व्हायरल करू नये, एखाद्याने आक्षेपार्ह फोटो, व्हिडीओ क्लिप पाठवली तर ती दुसºयाच्या मोबाईलवर फॉरवर्ड करू नये, जागेवरच ब्लॉक करावे तसेच संबंधिताचे नाव पोलिसांना तत्काळ कळवावे, काही अनुचित प्रकार घडल्यास ग्रुप अॅडमीन कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहाणार आहे, असेही पोलिसांनी सांगितले.दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून काही ग्रुप अॅडमीनना १४९ सीआरपीसी प्रमाणे नोटीस देण्याची प्रक्रिया सुरू असून, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि धार्मिक संघटनेशी जोडलेल्या कार्यकर्त्यांसोबत पोलीस वारंवार बैठका घेत आहेत. निकाल लागल्यानंतर रस्त्यावर उतरून आनंदोत्सव साजरा करू नये, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.