मेढा : जावळी तालुक्यात पावसाची संततधार सुरू असून, अनेक गावांमधील विहिरी, ओढे व तलावांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. तालुक्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने कण्हेर धरणही पंधरा ते वीस दिवस अगोदर तुडुंब भरले आहे. पाणीसाठी झाला असला, तरी दुसरीकडे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
सांडपाणी रस्त्यावर
सातारा : पावसामुळे ओढे व गटारे तुंबल्याने सदर बझार परिसरात सांडपाणी मुख्य रस्त्यावरून वाहू लागले आहे. परिणामी, सर्वत्र घाणीचे साम्राज्य व दुर्गंधी पसरली आहे. या ठिकाणाहून ये-जा करणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. पालिकेच्या आरोग्य गटारांची तातडीने स्वच्छता करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.
बंदोबस्ताची मागणी
खटाव : शहरासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी उपद्रव घातला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ही कुत्री ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांच्या, तसेच वाहनधारकांच्या अंगावर धावून जात आहेत. ग्रामपंचायतीने भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
रस्ता पुन्हा खड्ड्यात
सातारा : येथील गुरुवार परज परिसरातील अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. पालिकेन पावसाळा सुरू होण्यापूूर्वीच या रस्त्याचे डांबरीकरण केले होते. मात्र, अल्पावधीत रस्त्यांची अवस्था जैसै थे झाली असून, ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. हे खड्डे चुकविताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
कारवाई थांबली
सातारा : पालिकेकडून मास्कचा वापर न करणाऱ्यांवर सुरू करण्यात आलेली कारवाई मोहीम थंडावली आहे. त्यामुळे बहुतांश नागरिक बाजारपेठेत मास्कविना निर्धास्तपणे वावरत आहेत. टाळेबंदीचे निर्बंध शिथिल झाल्याने बाजारपेठेतील सर्व दुकाने सोमवारपासून खुली झाली आहेत. त्यामुळे खरेदीसाठीही गर्दी वाढली आहे. मात्र, नागरिकांकडून शासन नियमांचे पालन केले जात नसल्याचे चित्र दिसून येत आहे.