सातारा : सातारा पालिकेच्या आगामी निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलणार असली, तरी येथील सत्तेचे राजकारण गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही राजेंभोवतीच फिरत राहिले आहे. भाजप वगळता मोठ्या पक्षाने राजेंच्या या सत्ता केंद्राला अद्यापही हादरा दिलेला नाही. मात्र यंदा परिस्थिती वेगळी आहे. राजेंचा गड काबीज करण्यासाठी सर्वच पक्षांनी रणनिती आखली आहे. तर दुसरीकडे दोन्ही राजे गड शाबूत ठेवण्यासाठी शाहूपुरी, खेड, विलासपूर, शाहूनगर, गोडोली या भागात आपले प्राबल्य वाढवू लागले आहेत.
सातारा शहराची हद्दवाढ झाल्याने यंदा नगरसेवकांची संख्यादेखील ४०वरून ४८वर पोहोचली आहे. त्यामुळे हद्दवाढीतील नगरसेवक यंदा पालिकेसाठी ‘गेम चेंजमेकर’ची भूमिका बजावणार आहेत. प्रामुख्याने शाहूपुरी हा भाग राजकीयदृष्ट्या सर्वात महत्त्वाचा मानला जात आहे. सुमारे २९ हजार लोकसंख्या असलेल्या शाहूपुरी, दरे खुर्द, तामजाई नगर, दौलत नगर या भागातून यंदा पाच नगरसेवक निवडून येऊ शकतात. शाहूपुरीत खासदार गटाचे पारडे जड असले, तरी विधानसभेला हा भाग आमदार गटाला लाभदायी ठरलेला आहे. त्यामुळे दोन्ही राजेंचे शाहूपुरी भागाकडे अधिक लक्ष आहे. प्रभागनिहाय आरक्षण पडल्यानंतर कोणाला उमेदवारी मिळणार अन् कोणाला नाही, हे जरी स्पष्ट होणार असले तरी सध्यातरी दोन्ही राजेंकडून नव्या दमाच्या शिलेदारांची चाचपणी सुरू झाली आहे.
दुसरीकडे खेड, शाहूनगर, कोडोली, विलासपूर हा भागदेखील पालिकेसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. या भागातून तीन नगरसेवकांना पालिकेचा उंबरठा ओलांडण्याची संधी मिळू शकते. या त्रिशंकू भागाकडेदेखील दोन्ही राजेंनी लक्ष केंद्रीत केले आहेत. मात्र, काही ठिकाणी राष्ट्रवादीची ताकददेखील मोठी आहे, हे विसरून चालणार नाही. सातारा पालिकेचे राजकारण हे दोन्ही राजेंभोवतीच फिरत असले तरी यंदा राष्ट्रवादी, भाजप, सेना या पक्षांनीदेखील मोट बांधली आहे. एकूणच प्रभागनिहाय आरक्षणापूर्वी पालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत.
(चौकट)
राजेंचे लक्ष वाढीव भागाकडे
साताऱ्याचे राजकारण ‘जलमंदिर’ व ‘सुरुची’ बंगला या दोन सत्ताकेंद्रांभोवतीच फिरत आले आहे. आगामी निवडणुकीत पाच नगरसेवक देणाऱ्या शाहूपुरीवर दोन्ही राजेंची मुख्यत्वे मदार आहे. त्यामुळेच कण्हेर पाणी पुरवठा योजनेचा हुकमी पत्ता खेळण्यास व मुलभूत कामे मार्गी लावण्यास खासदार गट सज्ज झाला आहे.
जोड...