मायणी : गरिबांसाठी शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या स्वस्त धान्य दुकाने (रेशनिंग दुकाने) यामध्ये गेल्या काही दिवसांपासून काळाबाजार सुरू असून, काळ्याबाजाराशी निगडित असलेल्या अधिकारी व इतरांची चौकशी व इतर मागण्यांसाठी जनता क्रांती दलामार्फत बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना शासनामार्फत गोरगरिबांसाठी धान्य मिळावे म्हणून मोठ्या प्रमाणात धान्य साठा उपलब्ध करून दिला होता. मात्र, याच काळामध्ये संबंधित दुकानदार व त्यांच्याशी निगडित असलेल्या पदाधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात या धान्याचा काळाबाजार झाला असून, या धान्याच्या काळ्याबाजाराची सखोल चौकशी व्हावी.
तसेच इतर मागण्यांसाठी जनता क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष सत्यवान कमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष विकास सकट, आम आदमी पार्टीचे रमेश सकट यांच्यासह विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांकडून बेमुदत धरणे आंदोलन येथील चांदणी चौकामध्ये सोमवार, दि. २२ पासून सुरू केले आहे.
या धरणे आंदोलनास परिसरातील शेकडो ग्रामस्थांनी सकाळपासून भेट देण्यास सुरुवात केली आहे. जोपर्यंत या धान्याच्या काळ्याबाजाराची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष विकास सकट यांनी दिली.
२२मायणी
धान्याच्या काळ्याबाजाराशी निगडित असलेल्यांची चौकशी व्हावी, यासाठी जनता क्रांती दलाकडून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे.