सातारा : स्वातंत्र्यदिन म्हटलं की,आपल्या मागण्यांसाठी आंदोलकांमधून आत्मदहन करण्यासाठी चढाओढ सुरू असते. यंदाही जिल्ह्यातून ३९ जणांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला होता. मात्र, अशा लोकांना आंदोलनापासून परावृत्त करण्यास पोलिसांना यश आले. त्यामुळे स्वातंत्र्यदिनी कायदा व सुव्यवस्थेचा बिकट प्रश्न निर्माण झाला नाही.स्वातंत्र्यदिनी आंदोलन केले तर प्रशासनापर्यंत आपल्या मागण्या सहज पोहोचतात, अशी एक धारणा पूवीर्पासूनच आंदोलकांमध्ये आहे. त्यामुळे इतर दिवशी प्रशासनाने दखल घेतली नाही तर आंदोलनाचा मुहूर्त हा शक्यतो स्वातंत्र्यदिनी निवडला जातो.
या दिवशी जिल्ह्यात पालकमंत्र्यासह प्रशासकीय अधिकारी आणि लोक प्रतिनिधी उपस्थित राहतात. त्यामुळे स्वातंत्र्यदिनी आंदोलन केले तर आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले जाईल, ही सुद्धा एक त्यांची समजूत असते. त्याप्रमाणे दर वर्षी स्वातंत्र्यदिनी आंदोलकांचे आत्मदहन करण्याचे इशारे येत असतात.
यंदाही अशा प्रकारचे तब्बल ३९ अर्ज प्रशासनाला मिळाले होते. हे अर्ज स्वातंत्र्यदिनापूर्वी आठ दिवस मिळाल्यामुळे पोलिसांना त्यांचीशी चर्चा करण्यास वेळ मिळाला. लोकशाही मागार्ने तुमच्या मागण्या प्रशासनापर्यंत पोहोचवा. आततायीपणा करून स्वत:चा जीव धोक्यात घालू नका, असे पोलिसांनी सर्व आंदोलकांना समजावून सांगितले. त्यामुळे सर्व आंदोलक आत्मदहनापासून परावृत्त झाले. आम्ही स्वातंत्र्यदिनी आंदोलन करणार नाही. आमच्या मागण्यासंदर्भात संबंधित कार्यालयात जाऊन दाद मागू, अशी लेखी हमी आंदोलकांनी पोलिसांकडे दिली. त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वातंत्र्यदिनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पोलिसांसह अग्निशामक दलाच्या जवानांना डोळ्यात तेल घालून आंदोलकाची वाट पाहावी लागते. आंदोलक कुठूनही येण्याची शक्यता असल्याने गोपनीय विभागातील पोलिसांना प्रचंड खबरदारी घ्यावी लागते. ही खबरदारी यंदा या विभागाने अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडली. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही या विभागाचे विशेष कौतुक केले जात आहे.दोघांना समजमाण तालुक्यातील राणंद येथील अनिता हणमंत दळवी यांना गावातील काहीजण त्रास देत असल्याने त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता तर प्रशांत शिंदे (रा. डी मार्टजवळ) यांनी विविध मागण्यांसाठी प्रशासनाच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला होता. हे दोघेही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आले होते.
यावेळी पोलिसांनी त्यांना समजावून सांगून आंदोलनापासून परावृत्त केले. साताऱ्यातील संभाजीनगरमधील कविता दरेकर यांनी सांडपाण्याबाबत तर विठ्ठल बनसोडे (सातारा) यांनी जमीन व घरकुलासंदर्भात आंदोलनाचा इशारा दिला होता.