वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्यातील सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या देऊर, रेवडी, सातारारोड, अंबवडे गावांतील ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला धक्का देत शिवसेना आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सत्तांतर घडवत सत्ता कायम केली.
कोरेगाव तालुक्यातील प्रमुख ग्रामपंचायत निवडणुकीत देऊर येथील ग्रामपंचायत आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असताना या ग्रामपंचायतीवर माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल कदम यांच्या श्री मुधाईदेवी परिवर्तन पॅनेलने आठ जागा घेत परिवर्तन घडविले. यामध्ये सत्ताधारी शेतकरी पॅनेल एक जागा, देऊर विकास आघाडी एक जागा, तर अपक्ष एका जागेवर विजयी झाले.
वाठार स्टेशन ग्रामपंचायतमध्ये महाविकास आघाडीने १३ पैकी १० जागा मिळवत सत्ता कायम ठेवली. रेवडी ग्रामपंचायतीवर आमदार शशिकांत शिंदे यांची सत्ता उलथवून टाकत आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलने ७ जागा घेत सत्तांतर घडवले, तर सातारारोड, पाडळी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी व काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग लावत आमदार महेश शिंदे यांनी १७ पैकी ११ जागा घेत सत्तांतर घडवले. अरबवाडी गावात तानाजी गोळे यांच्या सत्तेला शह देत राष्ट्रवादीच्या संदीप भोसले यांच्या गटाची सत्ता आली, तर दहिगावमध्ये भाजपला धक्का देत राष्ट्रवादीने सत्ता कायम केली, तर सोळशी, नांदवळ, फडतरवाडी गावांतील सत्ता मात्र कायम राहिली.
चौकट..
चिठ्ठीवर सत्ता बदलली...
अंबवडे (स) वाघोली गावांतील ९ जागांपैकी आमदार शशिकांत शिंदे यांच्या पॅनेलला चार व आमदार महेश शिंदे यांच्या पॅनेलला चार जागा मिळाल्या, तर सत्तेसाठी असणारी पाचवी जागा निश्चित करताना दोन्ही पॅनेलच्या महिलांना २२६ अशी समान मते मिळाली. त्यामुळे दोन्ही उमेदवारांना बोलवून चिठ्ठी टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. यात आमदार महेश शिंदे यांच्या पॅनेलच्या उमेदवाराची चिठ्ठी एका मुलीने उचलून दिली व याद्वारे उमेदवार विजयी होऊन आमदार शशिकांत शिंदे यांची सत्ता आमदार महेश शिंदे यांच्या पॅनेलकडे गेली.