सातारा : ‘ग्रामीण जनतेच्या विकासाचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक येऊ घातली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि ग्रामीण जनतेच्या प्रश्नांना सर्वोच्य प्राधान्य देणाऱ्या तथापि प्रस्थापित व्यवस्थेकडून डोईजड होईल म्हणून वेळोवेळी डावलण्यात आलेल्या किंवा खच्चीकरण केल्या गेलेल्या समविचारी, सर्व पक्षीय व्यक्तींचे संघटन करून, राजधानी सातारा जिल्हा विकास आघाडी स्थापन करावी. त्याचे नेतृत्व त्या-त्या तालुक्यातील सुज्ञांनी करावे,’ असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे.याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शेतकऱ्यांविषयी पोकळ कळवळा दाखवणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यानेच, बळीराजाची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खालावत आहे. शेतक-यांच्या ज्वलंत प्रश्नांची सोडवणूक करण्याचे कोणालाच भान राहीलेले नाही. शेतकरी आणि ग्रामिण संस्कृती टिकली पाहीजे असे नुसते बोलले जाते, परंतु त्यादृष्टीने कोणतीही ठोस कृती केली जात नाही. याउलट शेतकऱ्यांशी निगडीत प्रश्न कसे चिघळत राहतील, प्रलंबीत राहीतील अशीच व्युहरचना आखली जात आहे असे एकंदरीत सर्वसाधारण चित्र महाराष्ट्रात जवळजवळ सर्व ठिकाणी दिसतआहे. याबाबतचा विचारविनिमय करण्यासाठी मंगळवार, दि. २७ डिसेंबर २०१६ रोजी कल्याण रिसॉर्ट, एमआयडीसी सातारा येथे दुपारी १.३० ते ५ वाजेपर्यंत लोकसभा मतदार संघातील सर्व तालुक्यांमधील कोणत्याही पक्षाचे जे कोणी उत्साही समविचारी उपस्थित राहतील त्यांच्याशी आम्ही व्यक्तीगत चर्चा करणार आहोत. ग्रामीण विकासाच्या दृष्टीने अशा संस्थांवर शेतकऱ्यांविषयी खरे प्रेम आणि आस्था असलेल्या व्यक्ती आल्यास शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी प्राथमिक स्तरावरच योग्य उत्तर शोधण्याचे प्रयत्न होतील. ज्यांना शेतकरी आणि ग्रामीण जनतेविषयी विशेष आस्था आहे अशा समविचारी आणि सर्व पक्षीय लढावू व्यक्तींचे योग्य संघटन राजधानी सातारा जिल्हा विकास आघाडीच्या माध्यमातून केले जावे, सातारा लोकसभा मतदार संघातील प्रत्येक तालुक्यातील संबंधित सुज्ञांनी, त्यांच्या त्यांच्या तालुक्यात आघाडीचे नेतृत्व करावे आणि या राजधानी जिल्हा विकास आघाडीच्या माध्यमातून शेतकरी आणि ग्रामीण जनतेचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सक्षम पर्याय मिळावा या दृष्टीने प्रयत्न करीत आहोत. प्रस्थापित राज्यव्यवस्थेकडून, वेळोवेळी ज्यांना डावलले, खच्ची केले अशा सर्व पक्षीय लढावू व्यक्तींशी, विचारविनिमय करण्यासाठी आम्ही बुधवार, दि. २७ डिसेंबर रोजी व्यक्तीगत चर्चा करणार आहोत. जिल्ह्यातील, राष्ट्रवादी कॉँग्रेस, कॉँग्रेस, भाजपा, शिवसेना, आरपीआय, शेतकरी संघटना, रासप, बसप आणि अन्य सर्व पक्षीय व्यक्तींनी, आमच्या विकासाच्या विचारांशी सहमत असल्यास व्यक्तीगतरीत्या बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहनही खा. उदयनराजे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)आजपर्यंत ठेकेदारांचेच चोचले पुरविले...ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुका लवकरच होत आहेत. प्रस्थापित व्यवस्थेने ठेकेदार, पुरवठादार यांचे चोचले पुरवण्यासाठी ज्या सर्वसामान्य समाजसेवकांना वेळोवेळी डावलले आहे. शेतकऱ्यांविषयी आस्था असलेल्या अशा लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून शेतकरी समाधानी राहण्यासाठी गाव पातळीवर प्रयत्न होण्याबरोबरच सातत्याने खच्चीकरण करण्यात आलेल्या किंवा वारंवार डावलले गेलेल्या परंतु शेतकऱ्यांविषयी कळवळा असलेल्या कार्यकर्त्यांना एकप्रकारे नवीन संधी मिळणार आहे, असेही खा. उदयनराजे भोसले यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे.
झेडपी निवडणुकीत उदयनराजेंची स्वतंत्र आघाडी
By admin | Published: December 23, 2016 11:05 PM