कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील येरवळे ग्रामपंचायत निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सर्वपक्षीय पॅनल विरुद्ध अपक्षांचे पॅनल, असे दोन पॅनल एकमेकांसमोर शड्डू ठोकून रिंगणात उतरले आहेत. परिणामी, सर्व पक्षीयांची सरशी होणार की, अपक्ष सत्ता स्थापन करणार, याबाबत परिसरात चर्चा होऊ लागली आहे.
येरवळे ग्रामपंचायतीवर उंडाळकर गटाची सलग वीस ते पंचवीस वर्षे सत्ता कायम होती. मात्र, गत पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेसप्रणीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गटाने सत्ताधारी पॅनलला धक्का देऊन ग्रामपंचायतीमध्ये आपली सत्ता स्थापन केली. मात्र, यावेळेस चित्र काहीसे वेगळे दिसून येत आहे. उंडाळकर गट, चव्हाण गट आणि भोसले गट एकत्र येऊन एक पॅनल, तर अपक्षांनी दुसरे पॅनल उभे केले असून, दुरंगी लढत होत आहे. एकूण अकरा सदस्यांसाठी ही लढत होत आहे.
ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणूक म्हटलं की प्रकर्षाने जाणवते ते भावकी, राजकीय घराणे आणि राजकीय विविध पक्षप्रणीत गट यांच्यात सत्ता स्थापन करण्यासाठी लागणारी स्पर्धा. मात्र, जिल्ह्यात प्रथमच येरवळे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उंडाळकर गट, पृथ्वीराज चव्हाण गट आणि भोसले गट राग, द्वेष, हेवेदावे बाजूला करून एका पॅनलच्या माध्यमातून रिंगणात एकत्र उतरले आहेत, तर त्यांच्याविरुद्ध गावातील युवकांनी एकत्र येऊन अपक्षांच्या माध्यमातून शड्डू ठोकला आहे. दोन्ही पॅनल विकासाच्या माध्यमातून मतदारांना मत मागताना दिसत आहेत. मात्र, सूज्ञ मतदार कोणाला निवडतो, हे लवकर समजेल.