वाई : राज्यातील सामान्य मजूर कामगार महागाईने त्रस्त झालेला असून, पेट्रोल, डिझलला जीएसटी लावा व अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रणात आणा, वस्तूवर उत्पादन मूल्य छापण्याचा कायदा करा, मंदिरे चालू करा, सर्व असंघटित कामगारांना दहा हजारांची मदत, आदी मागण्या भारतीय मजदूर संघाच्या निवेदनात करण्यात आल्या.
महागाईच्या प्रश्नांकडे केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी राज्यभर निदर्शने करण्यात आली. वाई येथे तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने करून तहसीलदार रणजित भोसले यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी अंगणवाडी केंद्रीय संघटना सचिव वनिता सावंत, राज्य सचिव नंदा चव्हाण, रिक्षा संघटना प्रतिनिधी संदीप जाधव, बांधकाम कामगार संघटना प्रतिनिधी रवींद्र भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई, ठाणे, पालघर, जळगाव, नांदेड, जालना, नाशिक आदी जिल्ह्याच्या ठिकाणी तर अनेक तालुक्यांत आंदोलन करून पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
भारतीय मजदूर संघाच्या केंद्राच्या निर्णयानुसार संपूर्ण देशभर आंदोलन करण्यात येणार आहे.
अनेक ठिकाणी राज्यशासनाने जमावबंदीचा आदेश दाखवून आंदोलन करण्यास मनाई केली तर मुंबई पोलिसांनी आंदोलन करायचे असेल तर प्रत्येकी १५ हजारांचा जामीन आणा, असे सांगितले. सरकारच्या या हुकूमशाहीचा निषेध करण्यात आला. सरकारने महागाई नियंत्रणात न आणल्यास राज्यभर रास्ता रोको आंदोलन करावं लागेल, असा इशारा दिल्याची माहिती प्रदेश अध्यक्ष ॲड. अनिल ढुमणे व महामंत्री मोहन येनुरे यांनी दिली. निवेदनावर वनिता वाडकर, स्मिता पानसे, कोमल जगताप यांच्यासह विविध संघटनांच्या सदस्यांच्या सह्या आहेत.