कऱ्हाड : ‘थकबाकीदारांचा काल्पनिक आकडा जाहीर करून सभासदांमध्ये अफवा पसरविणाऱ्या डॉ. इंद्रजित मोहिते यांनी कारखान्याच्या वापरलेल्या ट्रॅक्टरचे भाडे, शेणखत आणि उधारीवर नेलेल्या औषधांचे अशी एकत्रित रक्कम तब्बल २६ वर्षांनी दोन दिवसांपूर्वी भरली. त्यांच्या या कृत्याने त्यांचा कारखानाहिताचा बुरखा आता पुरता फाटला आहे. त्यांचे चुलतबंधू व ते स्वत: अध्यक्ष असताना त्यांना ही बाकी का भरावीशी वाटली नाही. थकबाकीदारांसंबंधीचा कायदा तोच आहे, मग आताच त्यांनी ही रक्कम का भरली?,’ असा सवाल कारखान्याचे अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी पत्रकाद्वारे विचारला आहे. प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ‘डॉ. मोहिते यांच्या नावावर जे काही समभाग आहेत. त्या समभागांच्या नावे १६ फेब्रुवारी १९८९ रोजी खासगी कामासाठी कारखान्याचा ट्रॅक्टर आणि ट्रॉली वापरली आहे. त्याचे भाडे ४१०० रुपये झाले होते. १८ फेब्रुवारी १९८९ रोजी ३६ हजार ९३८ रुपयांचे शेणखत नेले होते. तसेच त्याचदिवशी उधारीवर नेलेले औषधांचे १२७ रुपये येणे बाकी होते. अशी ४१ हजार १६५ रुपयांची थकबाकी त्यांच्याकडे निघत होती. ती रक्कम भरून त्यांनी स्वत:ला बेबाकी करण्याचा प्रयत्न केला आहे. डॉ. मोहिते स्वत:ला फारच अभ्यासू समजत असतील. त्यांच्याकडून किंवा ते धारण करीत असलेल्या समभागावर एक रुपयाचेही येणेबाकी दिसायला नको होते. मग एवढी मोठी रक्कम त्यांना का दिसली नाही?’ थकबाकीही स्वत:च भरावी ‘डॉ. मोहिते यांनी ही थकबाकी स्वत: अध्यक्ष असतानाच का वसूल केली नाही. ते म्हणतात, तशी कोणतीही नोटीस कारखान्याने पाठविली नाही. मग त्यांनी ही रक्कम का भरली, असा प्रश्न उपस्थित होतो. आता त्यांनीच निर्माण केलेल्या यशवंतराव मोहिते कृषी ज्ञानपीठ या खासगी ट्रस्टकडे असलेली थकबाकी रक्कम स्वत:च भरावी,’ असे आवाहनही अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
इंद्रजित मोहितेंनी भरली ‘कृष्णा’ची थकबाकी !
By admin | Published: March 29, 2015 12:39 AM