मातांसाठी स्वतंत्र कोरोना कक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरेगाव : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट ही लहान मुले आणि स्तनदा मातांसाठी धोकादायक असल्याची शक्यता गृहीत धरून आमदार शशिकांत शिंदे यांनी कोरेगावातील चॅलेंज कोविड हॉस्पिटलमध्ये लहान मुले आणि स्तनदा मातांसाठी स्वतंत्र कक्षाची उभारणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
कोरोनाची तिसरी लाट येत्या काही महिन्यांत भारतात धडकण्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेसह देशभरातील वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसर्या लाटेने हाहाकार माजवला, त्यामुळे तिसरी लाट ही निश्चितच धोकादायक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळ न दवडता त्यासाठी उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आ. शिंदे यांनी दिली.
तिसर्या लाटेचा प्रभाव हा एक ते दहा वयोगटातील मुलांसह स्तनदा मातांवर राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे चॅलेंज कोविड हॉस्पिटलमध्ये आतापासूनच स्वतंत्र कक्ष उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. स्त्री आरोग्य तज्ज्ञ, बाल आरोग्य तज्ज्ञांसह वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींचे याकामी मार्गदर्शन घेतले जाणार असून, तेथे आधुनिक पद्धतीने उपचार केले जाणार आहेत. तेथे तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी देखील नियुक्त केले जाणार आहेत.
(चौकट)
जनतेच्या आरोग्याची काळजी
कोरेगाव मतदारसंघातील जनतेच्या आरोग्याची काळजी असल्यानेच आम्ही कोरोना काळात दीर्घकालीन उपाययोजना करण्यास प्राधान्य दिले आहे. तिन्ही तालुक्यातील ग्रामीण भागात कोविड सेंटर्स, आयसोलेशन सेंटर्सची उभारणी केली असून, तेथे मोफत जेवण व औषधोपचाराची सोय केली आहे. तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पालकांनी कोणत्याही स्वरूपाची भीती बाळगू नये, असे आवाहन आमदार शशिकांत शिंदे यांनी केले आहे.